Sharad Pawar Speech in Rain : यंदाच्या निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) प्रचाराचा 'शरद पवार पॅटर्न' (Sharad Pawar Speech) वापरला जात असल्याचं दिसत आहे. प्रणिती शिंदे, संजय जाधव अन् राजेश टोपे यांनी भरपावसात भाषण केलं आहे. 2019 मध्ये शरद पवार यांचं भरपावसातलं भाषण गाजलं होतं. त्यांचा हाच भरपावसातील भाषणाचा फंडा आता इतर राजकारण्यांकडूनही वापरला जात आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रचाराचा 'शरद पवार पॅटर्न' राबवला जात आहे. सरकार आणि विरोधकांकडून प्रचारासाठी भरपावसात सभा आणि भाषण केलं जात आहे. आता याचा कितपत फायदा होणार आहे, हे येणारा काळच सांगेल. मात्र, सर्वजन सध्या प्रचारात गुंतलेले दिसत आहेत.


प्रचाराचा 'शरद पवार पॅटर्न'! 


शरद पवार आणि राजकारण हे एक समीकरणंच बनलं आहे. राजकारणात शरद पवार यांना चाणक्य म्हटलं जातं. परिस्थिती समजून घेण्यात आणि निर्णय घेण्याच्याबाबतीत त्यांना तोड नाही. आपल्या राजकीय वाटचालीत शरद पवारांनी अनेक आव्हाने यशस्वीरित्या पेलली आहेत. सध्या त्यांनी नव्याने पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. 83 वर्षाच्या शरद पवारांचा जोश आजच्या तरुणाईलाही लाजवेल असा आहे. राजकारणात आजही लोक शरद पवारांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे धडे गिरवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात असंच काहीसं घडत आहे.


प्रणिती शिंदेंची भर पावसात कॉर्नर सभा 


सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांची भर पावसात कॉर्नर सभा घेतली. सोलापुरातील बाळे येथे प्रणिती शिंदे यांची कॉर्नर सभा सुरू असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. मात्र, प्रणिती शिंदे यांनी पावसात भिजत भाषण केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रणिती शिंदे यांनी दमदार भाषण केलं.


पावसात संजय जाधव अने राजेश टोपेंचंही भाषण 


लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेलं असताना अवकाळी पाऊस सर्वत्र बरसताना दिसत आहे. याच पावसाचा फटका बैठकांना ही बसतोय. मात्र उमेदवार अन् नेते आता या पावसात भाषण ठोकत आहेत. परभणी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ घनसावंगी येथील तीर्थपुरीत संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होते. या बैठकीला राजेश टोपेंसह अनेक नेते अन कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र भाषण सुरु असतानाच पाऊस सुरु झाला, मग काय महाविकास आघडीचे उमेदवार संजय जाधव अन् राष्ट्रवादी शरद पवार यांचे नेते राजेश टोपेंनी यांनी भिजून भर पावसात भाषण ठोकलं आहे.


2019 मधील शरद पवारांचं भरपावसातील भाषण


शरद पवारांच्या एका कृतीमुळे  2019 च्या निवडणुकांना वेगळं वळण लागलं होतं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवारांचं भरपावसातलं भाषण तुफान गाजलं होतं. भरपावसातील शरद पवारांच्या त्या एका सभेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल चांगला लागला होता. भरपावसात शरद पवारांनी जनतेला आवाहन केलं आणि जनतेने त्यांना पाठिंबा दिला. आता हाच प्रयत्न यंदाच्या निवडणुकीत होताना दिसत आहे.