Why Dhairyasheel Mohite Patil Joins Sharad Pawar's NCP : गेल्या 5 वर्षापासून राजकारणापासून अंतर ठेवून असलेले सोलापुरातील मोहिते पाटील घराणे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी रविवारी (दि.15) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय. अकलूजमध्ये शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. दरम्यान, 2019 च्या निवडणुकीपूर्वी  मोहिते पाटील घराण्याचा भाजपमध्ये प्रवेश झाला होता. मात्र, विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite–Patil) यांनी अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यानच्या काळात विजयसिंह यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधानपरिषदही देण्यात आली होती. मात्र, तरीही धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी कमळाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय का घेतला? जाणून घेऊयात....


राम सातपुते आणि रणजीत निंबाळकरांकडून मोहिते पाटिल कुटुंबियांचा अनादर


माढाचे खासदार रणजित निंबाळकर यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आणण्यासाठी मोहिते पाटलांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण निवडून आल्यानंतर निंबाळकर यांनी विजयसिंह मोहिते पाटिल यांचा सन्मान ठेवला नाही, अस धैर्यशील मोहिते पाटिल यांनी बोलून दाखवलय. अकलूजमधील सभेत धैर्यशील मोहिते पाटलांनी माळशीरसचे आमदार राम सातपुते यांच्यावर हल्लाबोल केलाय. राम सातपुते यांनी गेल्या 70 वर्षात विकास झाला नाही, तेवढा मी अडिच वर्षात केला, असं म्हटलं होतं. धैर्यशील मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना सर्वच गोष्टी बोलून दाखवल्या आहेत. शिवाय, धैर्यशील समर्थकांकडून यावेळेस निवडणुक लढले नाहीत तर, मोहिते पाटील घराण्याचे वर्चस्व संपेल, असंही बोललं जात होतं. 


काय म्हणाले धैर्यशील मोहिते पाटील ?


धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, निरा देवधरच धरणाची मंजुरी करायची होती. 80 च्या दशकात निलंगेकर साहेबांकडून धरण मंजूर करुन घेतलं. नंतरच्या काळात रामराजे साहेबांनी योगदान दिलं. त्यानंतर विदर्भाचा अनुशेष निघाला, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील सर्व योजनांवर राज्यपालांनी बंदी घातली. आता तिकडचा अनुशेष दूर झाला. ज्याला 1 लाख मतं दिली, त्याचं काम होतं मोठ्या दादांना बैठकीला न्यायचे. पण दादांना नेले नाही. तेव्हा अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये आली नव्हती. फायली तयार ठेवल्या होत्या. फक्त पुढ ढकलायचे काम होते. हे सांगतेत मी पाणीदार खासदार आहे, असं म्हणत धैर्यशील मोहिते पाटलांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी विजयसिंह यांचा अनादर केल्याचे स्पष्ट केले. 


शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अजित पवारांची 'दादागिरी' संपली


विजयसिंह मोहिते पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वाची लढाई होती, असं बोललं जातं. राष्ट्रवादीतील अनेक ज्येष्ठ सहकारी अजित पवारांना स्पर्धक वाटायचे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांची 'दादागिरी' आहे, असंही राजकीय विश्लेषक सांगतात.  मोहिते पाटलांचे सोलापूर जिल्ह्यात वर्चस्व होते. अजित पवारांनी मोहिते पाटलांचे महत्व कमी करण्यासाठी माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांना बळ दिल्याचेही बोलले जाते. मात्र, आता अजित पवारांनी वेगळ्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतल्याने मोहिते पाटलांना स्पेस मिळाली असल्याचेही बोलले जात आहे. 


संजय शिंदे, बबन शिंदेंची फडणवीसांची जवळीक वाढली 


महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जुलै  2023  मध्ये प्रवेश झाला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा महायुतीत प्रवेश झाल्यानंतर सोलापुरात माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली. काही दिवसांपूर्वी शिंदे बंधू फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गेल्याचही सर्वांनी पाहिलं होतं. त्यामुळे मोहिते पाटील घराणे नाराज झाल्याची चर्चा आहे. मोहिते पाटलांचे महत्व कमी करण्यासाठी प्रयत्न केल्याचेही मोहिते पाटिल समर्थक बोलत होते. दुसरीकडे रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडून पराभूत होऊनही शिंदे बंधूंनी भाजपच्या प्रचारास सुरुवात केली आहे. निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी दोघेही मैदानात उतरले आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या 


Shashikant Shinde : नरेंद्र पाटलांना माथाडी कामगार उत्तर देतील, उमेदवारी अर्ज भरताच शशिकांत शिंदेंचे प्रत्युत्तर