नवी दिल्ली: भाजप कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक (BJP Core Committee Meeting) बुधवारी (28 जून) रात्री पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार घेण्यात आली. कामगिरी सुमार असलेल्या मंत्र्यांना कामगिरी सुधारण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिल्याचं कळतं. आपल्याला मिशन 45 हे लक्ष पूर्ण करायचं आहे, त्यासाठी कामगिरी अधिक सुधारा असं देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत सांगितलं.


दरम्यान राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे शासकीय निवासस्थान पर्णकुटी इथे काल रात्री भाजप कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. रात्री साडेनऊच्या सुमारास बैठकीला सुरुवात झाली. बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारमधील भाजपच्या मंत्र्यांच्या कामाचा देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा घेतला. सोबतच स्नेहभोजन देखील पार पडलं. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, वनमंत्री सुधार मुनगंटीवार यांची उपस्थिती होती.


निर्णय घेताना काही अडचणी आल्यास मला सांगा : देवेंद्र फडणवीस


यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मंत्र्यांना सल्ला देत काही आदेशही दिले. कामगिरी सुमार असलेल्या मंत्र्यांना कामगिरी सुधारा, असं फडणवीस म्हणाले. राज्यात महाविकास आघाडीला टक्कर द्यायची असेल तर अधिक आक्रमक व्हा. आपल्याला मिशन 45 हे लक्ष पूर्ण करायचे त्यासाठी कामगिरी अधिक सुधारा, असं त्यांनी म्हटलं. तसंच तुम्ही घेतलेले निर्णय जनतेपर्यत पोहोचवा. निर्णय घेताना काही अडचणी येत असतील तर मला सांगा. आपल्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची कामे प्राधान्याने करा. जनतेत केंद्र आणि राज्य सरकारची प्रतिमा उंचवा, असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाजपच्या मंत्र्यांना दिला. 


भाजपचे मिशन 45 काय?


महाराष्ट्रात भाजपचे 'मिशन 45' ठेवलं आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या  48 पैकी 45 जागा जिंकण्याचं टार्गेट भाजपने ठेवलं आहे. याच मिशनसाठी काही केंद्रीय मंत्र्यांचे दौरे लोकसभा मतदारसंघात पार पडले आहेत. आता भाजपचे प्रमुख नेते विधानसभेच्याही 144 मतदारसंघात दौरे करणार असून निवडणुकीची रणनीती आखणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबाद आणि चंद्रपूर येथे जे.पी.नड्डा यांची सभा झाली. भाजपचे राष्ट्रीय नेते मिशन 45 ला  भरारी देण्यासाठी महाराष्ट्रात येत आहेत.