State Cabinet Meeting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखालील आज (28 जून) रोजी मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) पार पडली. दरम्यान या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान याच बैठकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar District) तीन प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहे. ज्यात छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून, यासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच वैजापूर तालुक्यातील बंधाऱ्यांना मान्यता देण्यात आली आहे. तर गंगापूर तालुक्यातील गंगापूर उपसा सिंचन योजनेस देखील मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 


मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या भव्य स्मारकासाठी 100 कोटींची तरतूद


छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. हे स्मारक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या समोर, विश्वासनगर लेबर कॉलनी येथे उभारण्यात येईल. यासाठी लागणाऱ्या 100 कोटी रुपयांच्या खर्चास देखील मंजूर देण्यात आली आहे. या शिवाय मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात आयोजित करावयाच्या कार्यक्रमांसाठी प्रत्येक जिल्ह्याकरिता 50 लाख रुपये, या प्रमाणे 4 कोटींच्या आराखड्यास देखील मंजूरी देण्यात आली.


वैजापूर तालुक्यातील बंधाऱ्यांना मान्यता


आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील बंधाऱ्यांना मान्यता देण्यात आली आहे. वैजापूर तालुक्यातील मौजे वांजरगाव तसेच नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील सावकी आणि विठेवाडी अशा तीन कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. तर वैजापुर तालुक्यातील मौजे वांजरगाव येथील बंधाऱ्यासाठी 13 कोटी 7 लाख रुपये, विठेवाडी येथील साठी 17 कोटी 11 लाख आणि सावकी बंधाऱ्यासाठी 20 कोटी 23 लाख रुपये खर्च येणार आहे. 


गापूर उपसा सिंचन योजनेस मान्यता


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील गंगापूर उपसा सिंचन योजनेस आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली . बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यापूर्वी या योजनेचे नाव ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना भाग-3 असे होते. गंगापूर तालुक्यातील 40 गावांतील 10 हजार हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचन पद्धतीने भिजवण्यात येणार आहे. यासाठी 693 कोटी 18 लाख रुपये इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.


इतर महत्वाच्या बातम्या: 


वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील 'हे' मोठे निर्णय