Devendra Fadnavis Meet Udayanraje Bhosale : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) पार्श्वभूमीवर नेत्यांच्या उमेदवारीबाबत अनेक चर्चा सुरु आहेत. उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी सातारा लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा जाहीर केली होती. दरम्यान, रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उदयनराजेंची राहत्या घरी भेट घेतल्याने उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. साताऱ्याचे भाजपचे नेते खासदार उदयनराजे भोसले यांचा नुकताच वाढदिवस संपन्न झाला. या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उदयनराजेंच्या जलमंदिर या राहत्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजेंची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
उदयनराजेंच्या उमेदवारीवर फडणवीसांची प्रतिक्रिया काय?
उदयनराजेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो असल्याची प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे. यावेळी फडणवीसांनी म्हटलं की, पहिल्यांदा आम्ही जागावाटप करणार आहोत, जागावाटप झाल्यानंतर ती प्रोसेस होईल. त्यामुळे इतर पक्षांप्रमाणे घोषणा करणार नाही, प्रोसेसनुसार उमेदवारीची घोषणा होईल. चर्चा अनेक आहेत, असं म्हणत उदयनराजेंच्या उमेदवारीवरही फडणवीसांनी बोललं टाळलं आहे. उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा जाहीर केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचंही त्यांनी तोंड भरून कौतुक केलं होतं. यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उदयनराजेंनी संकेत दिल्याची चर्चा रंगली आहे.
उदयनराजेंच्या उमेदवारीवर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
भाजपकडून लोकसभा उमेदवारी देण्यावर फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं की, ''आम्ही आता बसून कुणी कोणत्या जागा लढणार यासंदर्भात निर्णय करु. आमची चर्चेची पहिली फेरी झालेली आहे. या फेरीत बऱ्यापैकी प्रश्न सुटले आहे. आणखी दोन तीन फेऱ्या आम्हाला कराव्या लागतील, ज्यामध्ये सर्व प्रश्न सुटतील. एकदा कोणत्या जागा लढायच्या यावर ठरलं की मी तुम्हाला सांगेन. माझ्यासारख्या नेत्याने बोलणं योग्य नाही. योग्य वेळी सर्व गोष्टी समोय येतील. ''
लोकसभेच्या उमेदवारीसाठी उदयनराजेंकडून संकेत
सातारा जिल्ह्यामध्ये भाजपासाठी जे लोकसभेची मागणी करतायेत ते माझ्यासाठीच प्रयत्न करतायत असा मिश्किल टोला उदयनराजेंनी साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत याआधी लगावला होता. यामुळे थेट लोकसभेच्या उमेदवारीसाठी साताराचा उमेदवार म्हणून मीच असे संकेत त्यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. खासदार उदयनराजे यांनी उमेदवारीबाबत भाष्य करत मागील लोकसभेवेळी मला लोकांनी राजकीय आत्महत्या करताय असं सांगितलं होतं. अवघ्या तीन महिन्यात मी लोकसभेचा राजीनामा दिला. राजीनामा देणे म्हणजे तोंडचं काम नव्हते. कोणी निवडून आलेला सरपंच पदाचा राजीनामा देखील देताना विचार करतो मात्र, मी ज्या घराण्याचम नाव सांगतो त्या घराण्याचा विचारांशी मी बांधील आहे आणि तत्त्व आणि विचार महत्त्वाचे मानतो. राष्ट्रवादीचे विचार पटत नव्हते म्हणूनच मी भाजपमध्ये आलो. जेव्हा-जेव्हा मी माझे विचार मांडले, त्यावेळी त्यावेळी मी घराचा आहेर देतोय, असं सांगितलं गेलं.