Chhagan Bhujbal नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हाचे रायगडावर अनावरण करण्यात आले. यासाठी शरद पवार (Sharad Pawar) अनेक वर्षानंतर रायगडावर गेले होते. यावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया येत आहेत. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली असून शरद पवार हे रायगडावर गेले हे कौतुकास्पद आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच आगामी निवडणुकीत तुतारी किती वाजेल? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. 


नाशिक येथे छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, निवडणुकीत तुतारी किती वाजेल हे मी काही सांगू शकत नाही. एवढे वय असून तसेच शारीरिक अडचणी असतांना सुद्धा पवार साहेब रायगडावर गेले हे कौतुकास्पद आहे. ज्या वेळेला एखादी नवीन अशा प्रकारची चिन्ह वगैरे येते त्यावेळेस असा समारंभ केला जातो. ते रायगडावर गेले हे खूप आहे, कधी गेले नाही अशातला भाग नाही, गेलेच असतील आयुष्यात कधीतरी, असे त्यांनी म्हटले आहे.


छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना टोला


मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आज त्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहेत. याबाबत छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की, जो पहिल्यापासून दिशाहीन आहे. तो पुढची दिशा काय ठरवणार? त्याला दिशा कळली तर पाहिजे की योग्य दिशा कोणती आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.  


लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापला पक्ष काढण्याची मूभा


आपापल्या जिल्ह्यातील छोट्या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घ्या आणि गाव तसेच शहरातील छोटे पक्ष संपवा, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. यावर छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की, आता भाषण करताना बोलतात, असे बोलू नये. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापला पक्ष काढण्याची मूभा आहे.  आप किती लहान पक्ष होता. तो आता मोठा पक्ष झालाय, असे त्यांनी म्हटले.


काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते तेव्हाही असेच व्हायचे


राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. यावरून विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे. याबाबत छगन भुजबळ म्हणाले की, लोकसभा निवडणुका असतात. आचारसंहिता लागू होतात. म्हणून एक महिना अगोदर अधिवेशन घेतले जाते. पुढचे अधिवेशन होईल तेव्हा पूर्ण बजेट मांडणी करण्यात येईल.  ज्यांना काही आरोप करायचे ते करतात. केंद्राचे जे बजेट मांडले जाते त्याच्या आधारे आपण बजेट तयार करून मांडत असतो. अधिवेशन संपल्यावर चार-पाच दिवसात आचारसंहिता लागू होईल मग काय करणार? ज्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार होते त्यावेळी असेच करत होतो, असे छगन भुजबळ यांनी म्हटले. 


आणखी वाचा


Sanjay Raut : आम्ही ठरवलं तर एका दिवसात भाजप संपेल, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल