मुंबई: मराठी माणसांविषयी गरळ ओकणारा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा (MTDC) मुजोर अधिकारी अखिलेश शुक्ला याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कल्याणमधील योगीधाम परिसरात असणाऱ्या अजमेरा हाईटस् या इमारतीमध्ये राहणाऱ्या अखिलेश शुक्ला यांनी त्यांचे शेजारी असणाऱ्या देशमुख कुटुंबीयांना गुंडांकरवी मारहाण केली होती. देशमुख कुटुंबातील दोन भावांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभरात अखिलेश शुक्ला यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असला तरी त्यांना अटक करण्यात दिरंगाई झाल्याने अखिलेश शुक्ला हे फरार झाले होते. त्यामुळे राज्यभरात नाराजीचे सूर उमटत होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सभागृहात महत्त्वाची घोषणा केली. त्यानुसार माजोरड्या अखिलेश शुक्ला यांना तात्काळा प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.
अखिलेश शुक्ला आणि त्याच्या पत्नीने मराठी माणसाला अपमानित होईल असा उल्लेख केला आणि त्यातून संतापाची लाट लोकांमध्ये निर्माण झाली आहे. एमटीडीसी मधे काम करणारा शुक्ला हा व्यक्ती आहे. त्याच्या पत्नीवर देखील गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर निलंबनाची कारवाई सुरू झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली.
जे माज करतात त्याचा माज उतरल्याशिवाय शांत बसणार नाही. मराठी माणूस कुणाच्या काळात बाहेर गेला, वसई-विरारला गेला याचा शोधही घ्यायला हवा. भाई माझे मित्र आहात तुम्ही आहात. मराठी माणूस 300 स्क्वेअर मीटरमध्ये राहतो. मोठ्या फ्लॅटमधे कोण राहतो, याचा शोध घायला हवा. उत्तर प्रदेश, बिहारमधून इथे आलेले लोक आपल्यासारखे मराठी उत्तम बोलतात. आपल्यासारखेच सण उत्सव साजरा करतात. मात्र, काहीजण चुकीचं बोलतात. त्यामुळे मुंबईच्या सोशल फॅब्रिकला धक्का लागतो. त्यांना ठणकावून सांगतो मराठी माणसावर अन्याय होऊन देणार नाही. प्रत्येकाला काय खायचं याचं स्वातंत्र्य संविधानाने दिलेलं आहे. घर नाकारण्याचा अधिकार कुणाला नाही. एखाद्या समाजाला शाकाहार महत्त्वाचा वाटतो तर त्यांची संघटना तयार करु शकतो, योजना तयार करु शकतो. शाकाहार पुरस्कार करणारे कोणी असेल तर त्याबाबत तिरस्कार करण्याचे कारण नाही. मात्र याचा फायदा घेऊन कोणी भेदभाव करत असेल तर ते मान्य होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले. अशा तक्रारी आल्या तर त्यावर योग्य कारवाई करण्यात येईल. आपल्या देशात अनेक परंपरा आहेत. बंगालमध्ये सगळे समाज मासळी खातात, काही राज्यात संपूर्ण शाकाहार आहे. आपल्या परंपरेने निर्गुण निराकार आणि सगुण साकार यांना देवत्त्वाचा दर्जा दिला आहे. मला असं वाटतं की, आपल्या देशाचं वैविध्य आहे, ते टिकलं पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. पण राष्ट्रीय अस्मितेनंतर मराठी ही आपली क्षेत्रीय अस्मिता आहे, त्यावर कोणी घाला घालणार असेल, तर त्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
आणखी वाचा