नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेत केलेल्या विधानाचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभेत उमटले आहेत. कालपासून (19 डिसेंबरपासून) महाराष्ट्रासह देशभरात शाहा यांच्याविरोधात आंदोलन केले जात आहे. कर्नाटकच्या विधानसभेत लोकप्रतिनिधींच्या डेस्कवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो लावण्यात आले होते. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या विधानसभेतही असेच चित्र पाहायला मिळाले. या फोटोमुळे नंतर सत्ताधारी आणि विरोधकांत चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. परिणामी महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
विधानसभेत नेमकं काय घडलं?
विधानसभेचे कामकाज नियमितपणे चालू झाले. मात्र सभागृहाचे कामकाज चालू होताच विरोधकांनी आपापल्या बाकासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावले. अमित शाहा यांनी डॉ. आंबेडकरांना केलेल्या विधानाचा निषेध म्हणून विरोधकांनी हे फोटो लावले होते.
आंबेडकरांचे फोटो आमच्या बाजूनेही लावावेत- अजित पवार
विरोधकांच्या बाकावर आंबेडकरांचे फोटो पाहताच उपमुख्यमंत्री अजित पवार आक्रमक झाले. अजित पवार त्यांनी उभे राहून विधानभा अध्यक्षांना उद्देशून बाबासाहेब यांच्यावर आमचाही अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही काही ठिकाणीच बाबासाहेबांचे फोटो लावण्यास परवानगी दिली आहे. आंबेडकरांचे फोटो आमच्या बाजूनेही लावावेत. तशी परवानगी आम्हाला द्यावी, अशी मागणी अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.
महापुरुषांचे फोटो लावण्याची परवानगी नाही- राहुल नार्वेकर
अजित पवार यांच्या या मागणीवर विधानसभा अध्यक्षांनी मी अशा प्रकारची कोणतीही परवानगी दिलेली नाही. दैवत किंवा महापुरुषांचे फोटो लावण्याची परवानगी नाही. या सभागृहाची परंपरा राखली पाहिजे, असे आवाहन करून विधानसभा अध्यक्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो काढण्याचे आवाहन केले.
सत्ताधारी विरोधकांची जोरदार घोषणाबाजी
मात्र, विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांचे आवाहन धुडकावून लावले. त्यानंतर सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावण्यास आम्हालाही परवानगी द्या अशी मागणी करत सत्ताधारी आमदार आणि मंत्री आक्रमक झाले. त्यानंतर भाजप आमदार वेलमध्ये उतरले. एकच साहेब बाबासाहेब म्हणून भाजप आमदारांनी घोषणा दिल्या. तर आंबेडकर, आंबेडकर म्हणून विरोधी पक्षाच्या आमदारांनी घोषणा दिल्या. परिणामी वाढत असलेला गोंधळ लक्षात घेऊन विधानसभा अध्यक्षांनी सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब केले.
हेही वाचा :