मुंबई: कल्याणमध्ये परप्रांतीयांकडून मराठी माणसांवर हल्ले केले जात आहेत. मराठी माणसं घाणेरडी आहत, त्यांना जगण्याचा अधिकार नाही, असं बोललं जातंय. मराठी माणसाला शिव्या घातल्या जात आहेत. मुंबईचं गुजरातीकरण आणि उत्तर भारतीयीकरण सुरु आहे. मोदी, शाह आणि देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) मुंबईत मराठी माणसाला दुय्यम वागणूक द्यायची आहे. त्यांना मुंबई ही व्यापारी आणि बिल्डर्सच्या घशात घालायची आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.


कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबाला अखिलेश शुक्ला या सरकारी अधिकाऱ्याने गुंडांकरवी मारहाण केली होती. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना महायुती सरकारवर टीकेची तोफ डागली. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या हक्कासाठी महाराष्ट्रात शिवसेना निर्माण केली. नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी शिवसेना पक्ष फोडून मराठी माणूस कमजोर केला. मराठी माणसाला मुंबईत दुय्यम दर्जा मिळावा आणि त्यांची ताकद नष्ट व्हावी, हीच मोदी-शाह आणि फडणवीसांची इच्छा असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.


त्यांना ही मुंबई अदानी, लोढा आणि गुंडेचा या बिल्डर्सच्या घशात घालायची आहे. त्यासाठी मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांचा गोतावळा काम करत आहे. विधानसभेच्या निकालानंतर मराठी माणसांवरील हल्ले वाढले आहेत. मराठी माणसांना मुंबईतून घालवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आता कल्याणमध्येही मराठी माणूस नकोसा झाला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी शिवसेना ज्यांच्या हातात दिली, ते नामर्द आहेत, ते सरकारमध्ये बसले आहेत. त्यांना कल्याणच्या घटनेची वेदना टोचतेय का? मुंबईचं गुजरातीकरण आणि उत्तरभारतीयीकरण केलं जातं आहे. कल्याणमधील कालच्या हल्ल्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसाची माफी मागितली पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले. राज ठाकरे यांची मनसे याबाबत काहीच भूमिका घेणार नाही. ते भाजपची भूमिका पुढे नेत आहेत. या सगळ्यांना स्वत:ला मराठी म्हणवून घ्यायला लाज वाटली पाहिजे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. यावर आता महायुती सरकार आणि भाजपकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 



आणखी वाचा


मराठी माणूस जागा झाला! परप्रांतीयांकडून देशमुख कुटुंबाला मारहाण, कल्याणमध्ये वातावरण तापलं, अजमेरा हाईटसमध्ये घोषणाबाजी


फेक IAS शुक्लाचा माज उतरवण्यासाठी आता मनसे मैदानात, वॉर्निंगच दिली; 24 तासांत अटक करा अन्यथा....