Girish Kuber : नाशिक येथील 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक आणि चुकीची माहिती लिहिल्याचा आरोप करत ही शाईफेक करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील यांनी म्हटले. दरम्यान, गिरीश कुबेर यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेचा विविध स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. 


फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन पोस्ट लिहित या घटनेचा निषेध केला आहे. फडणवीसांनी लिहिलं आहे की, 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या सर्वांचेच दैवत आहेत. काही चुकीचे लिहिले असेल तर त्याचा निषेधच झाला पाहिजे. परंतू साहित्य संमेलनात शाईफेक करणे हे चुकीचे आणि निषेधार्ह आहे. संमेलन ही अभिव्यक्तीची जागा आहे. चुकीच्या विचारांना तर्क आणि पुराव्यांनी उत्तर दिले पाहिजे.' 


 







नेमकं प्रकरण काय?


गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावरून वाद सुरू होता. या पुस्तकातील मजकूराबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात छत्रपती संभाजीराजे यांची बदनामी करण्यात आला असल्याचा आरोप याआधीच संभाजी ब्रिगेडने केला होता. या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत होती. दरम्यान गिरीश कुबेर हे आज (5 डिसेंबर) साहित्य संमेलनात एका परिसंवादात सहभागी होणार होते. या परिसंवादात सहभागी होण्याआधीच त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. 


संबंधित बातम्या