12 MP Suspended from Rajyasabha :  राजकारणात संख्येला महत्त्व असते. सरकार पाडण्यासाठी, सरकार स्थापन करण्यासाठी, एखाद्या विधेयकाला मंजुरी मिळवण्यासाठी आवश्यक संख्येची म्हणजे आकड्यांची तजवीज करावी लागते. आता राजकारणात पुन्हा एकदा 12 आकडा चर्चेत आला आहे. राज्यसभेने मागील अधिवेशन सत्र काळात गैरवर्तवणूक केल्याप्रकरणी 12 खासदारांचे निलंबन केले आहे. खासदारांच्या या निलंबनानंतर पुन्हा एकदा 12 आकडा चर्चेत आला आहे. 


महाराष्ट्रातील राजकीय सत्ता संघर्षात 12 हा आकडा मागील काही महिन्यांपासून चर्चेत आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपालांकडे राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी सरकारने पाठवली होती. मात्र, राज्यपालांनी या यादीतील 12 आमदारांना अद्यापही मंजुरी दिली नाही. 


महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल संघर्ष 


महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी 6 नोव्हेंबर 2020 रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. यादी सादर करुन एक वर्ष झाले तरीही राज्यपालांनी नियुक्ती केलेली नाही. जाणकारांच्या मते राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत राज्यपालांना स्वताच्या मर्जीतली नावं देता येत नाहीत. त्यांना फक्त सरकारनं दिलेल्या यादीवरच निर्णय घ्यायचा असतो. नावं पसंत नसेल तर ते फेटाळण्याचा अधिकार मात्र त्यांना आहे. सरकारची अडवणूक करायची असेल तर यादी निकषावर तपासून अडकवू शकतात, असंही जाणकार सांगतात. 


यादीत कोणाची नावे?


सचिन सावंत, रजनी पाटील, मुजफ्फर हुसैन, अनिरुद्ध वनकर (सर्व काँग्रेस),  एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, आनंद शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस), उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी (सर्व शिवसेना)


भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन


जुलै महिन्यात झालेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनात विधानसभेत तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. या निलंबित आमदारांना मुंबई आणि नागपूर विधीमंडळाच्या आवारात एक वर्षे प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. 


निलंबित आमदारांची नावे 


अभिमन्यू पवार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, राम सातपुते, गिरीश महाजन, संजय कुटे, नारायण कुचे, पराग आळवणी, हरिश पिंपळे, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांगडिया 


राज्यसभेतील 12 खासदार निलंबित


ऑगस्ट महिन्यात झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अभूतपूर्व गोंधळ झाला होता. कृषी कायदे, कोरोना परिस्थिती हाताळण्यात आलेले सरकारला अपयश यावरून पावसाळी अधिवेशन वादळी होणार अशी अटकळ बांधली जात होती. राज्यसभेत 11 ऑगस्ट रोजी मार्शल बोलवण्यात आले होते. एका विधेयकाच्या चर्चेदरम्यान हा गोंधळ झाला. यावेळी सुरक्षा रक्षक आणि खासदारांमध्ये वादावादीही झाली होती. या गोंधळाप्रकरणी राज्यसभेतील 12 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. 


निलंबित खासदारांची यादी


प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना), अनिल देसाई (शिवसेना), इलामाराम करीम (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष), फुलो देवी नेताम (काँग्रेस), छाया वर्मा (काँग्रेस), रिपुन बोरा (काँग्रेस), बिनॉय विश्वम (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), राजमणी पटेल (काँग्रेस), डोला सेन (काँग्रेस), शांता छेत्री (काँग्रेस), सय्यद नासिर हुसेन (काँग्रेस), अखिलेश प्रसाद सिंग (काँग्रेस)