मुंबई : भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी भाजपा महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ मुंबईतील साकीनाका परिसरात सभा घेतली. या सभेतून देशभक्ती आणि दहशतवादावर भाष्य करताना काँग्रेससह (Congress) इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. तसेच, काँग्रेससोबत गेल्यामुळे उद्धव ठाकरेही (uddhav Thackeray) गप्प बसले आहेत, तेही काही बोलत नाहीत, असे फडणवीसांनी म्हटले. भाषणाच्या सुरुवातीलाच, मी मोदीजी आणि नड्डा यांचे आभार मानतो, त्यांनी आतंकवाद्यांशी लढणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी दिली. आठवा तो हल्ला आपल्या मुंबईवरचा, आठवा तो कसाब, जो आपल्या हेमंत करकरे, अशोक कामटे, साळसकर यांना शहीद करून टाकतो,अशी आठवण सांगत फडणवीसांनी उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांच्या उमेदवारीवर भाष्य केलंय
उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली तेव्हा काँग्रेसने फणा केला, आपल्या शहिदांवर त्यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले. मात्र, आज कसाबला फाशी झाली ती उज्ज्वल निकम यांच्यामुळे झाली, असे फडणवीस यांनी म्हटले. आधी आपला देश कसा होता, इकडे आतंकवादी यायचे, हल्ले करुन जायचे आणि काँग्रेसचं सरकार फक्त निषेध करायचे. मात्र, मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला. त्यामुळेच, 2019 नंतर आपल्या देशात हल्ला करण्याची हिंमत पाकिस्तानच्या बापाची देखील झाली नाही, असे फडणवीस यांनी म्हटले.
उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
आपण दहशवाद्यांविरोधात लढा दिला. एक देशाच्या सीमेवर लढणारा आमचा सैनिक होता, दुसरा पोलीस होता, तर आमचा कोर्टात लढणारा एक सैनिक म्हणजे उज्ज्वल निकम होते, असे म्हणत दशवादाच्या मुद्दयावरुन देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. आमचे उद्धव ठाकरेदेखील तोंड बंद करून बसले आहेत. उद्धव ठाकरे काय होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं. तसेच, उद्धव ठाकरे बोलायला तयार नाही, त्यांना चिंता काही मुठभर मतांची आहे, म्हणून ते तोंड बंद करुन बसले आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरेंवरही फडणवीसांनी हल्लाबोल केला.
ही गल्लीची निवडणूक नाही दिल्लीची आहे, आपल्याला देशाचा नेता निवडायचा आहे. देशात आज महाभारतासारखे दोन गट झाले आहेत. कौरवांची संख्या जास्त होती, पांडवांची संख्या कमी होती. आज वेगवेगळ्या पक्षांसोबत आपली युती आहे आणि कौरवांकडे राहुल गांधी आहेत आणि राहुल गांधी यांच्याकडे उद्धव ठाकरे आहेत.
संजय राऊतांवर टीका
सकाळी 9 वाजता उबाठाचा एक भोंगा वाजतो, हा.. पोपटलाल, त्याला कुणीतरी विचारले तुमच्याकडे पंतप्रधान कोण आहे. तेव्हा, तो म्हणाला आमच्याकडे खूप आहेत, 5 वर्षांसाठी 5 पंतप्रधान आहेत. अरे पंतप्रधान निवडायचाय की घंटा संगीत खुर्चीचा खेळ आहे, असे म्हणत फडणवीसांनी संजय राऊत यांच्यावरही हल्लाबोल केला. तसेच, ज्यांना नेता नाही, निती नाही असे लोक आपल्यासमोर उभे आहेत. पण, आपल्याकडे देशभक्त उज्ज्वल निकम आहेत.
झोपडीत राहणाऱ्या प्रत्येकाला मोफत घर
मोदींनी लोकांना गरिबीतून बाहेर काढले, 50 कोटी लोकांच्या घरी गॅस पोहोचवला. 60 कोटी लोकांच्या घरी नळ दिले, 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिले. आमच्या तरुणांना 10 लाखांपर्यंत मुद्रा लोन देण्याचं कामही मोदींनी केले. मोदींनी सागितले तरुणाची गॅरंटी मी घेतो, देशात 10 कोटी महिला लखपती होतील. मोदींनी स्टँड अप योजना आणली, आदिवासी समाजासाठी 24 कोटींची योजना आणली, पारंपारिक व्यवसायिकासाठी 14 कोटींची योजना आणली, काँग्रेस पक्षाने आपल्याला गरिबाच्या नावाने लुबाडले. वेगवेगळी विकास कामे आपण केली, मुंबईच्या झोपडीत राहणाऱ्या प्रत्येकाला पक्क घर मिळेल आणि आम्ही ते मिळवून देऊ, असे आश्वासनही फडणवीसांनी मुंबईच्या सभेतून दिलं.