नवी दिल्लीः दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Kumar Jain) यांना खोट्या प्रकरणात गोवल्यानंतर आता केंद्र सरकार मनिष सिसोदियांना अटक करणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांना एक खोटे प्रकरण तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले असल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली. पंजाब निवडकुणीदरम्यान अशाच प्रकारचा दावा त्यांनी सत्येंद्र जैन यांच्याबाबतीत केला होता, हे विशेष.


दिल्ली सरकारच्या विकास कामांचे देशभरच नव्हे तर जागतिक पातळीवरही कौतूक होत आहे. मात्र केंद्रातील मोदी सरकार देशात अशांतता निर्माण करण्यासंदर्भात प्रयत्नशील आहे. त्यामुळे नागरिकांचा कल आपकडे वाढल्याचे नुकत्याच झालेल्या विविध निवडणुकीतून दिसून येत आहे. त्यामुळे या विकास कामांना थांबविण्यासाठी केंद्र सरकार आमच्या मंत्र्यांवर खोटे केसेस दाखल करुन त्यांना अटक करण्याच्या प्रयत्नात आहे. केंद्र सरकारने तपास यंत्रणांना कोणत्या ना कोणत्या प्रकरणात मनिष सिसोदिया यांना गोवण्याच्या सूचना केल्या आहे. पुढील काही दिवसांतच त्यांना अटक होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.


सर्वांना एकत्र अटक कराः केजरीवाल


आप पक्षाच्या सर्व आमदार आणि नेत्यांना एकत्र अटक करा. वाटेल तेवढ्या चौकशी करुन घ्या, मात्र दररोज नवनवीन कारणाने आम्हाला त्रास देऊ नका. आम्हाला अटक होण्याची भिती नाही आहे. मात्र नागरिकांनी ज्या विश्वासाने विकासासाठी आम्हाला मत दिले त्यांचे काम करण्यापासून आम्हाला अडवू नका असा टोलाही केजरीवाल यांनी लागावला आहे. मनिष सिसोदिया हे स्वतंत्र भारताचे सर्वात चांगले शिक्षण मंत्री असल्याचेही यावेळी केजरीवाल म्हणाले.


आप तर कॉंग्रेसला नैसर्गिक पर्याय


आम आदमी पार्टी राष्ट्रीय पातळीवर कॉंग्रेसला (Congress) पर्याय बनताना दिसत आहे. खुद्द आपच्या नेत्यांनीही तशी कबुली एखा मुलाखतीत दिली होती. दिल्लीनंतर आपला सर्वात मोठे यश पंजाबमध्ये मिळाले आहे. विरोधकांकडून विविध अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी सरकार नागरिकांना दिलेल्या वचनांची पूर्तता करणार असल्याची हमी केजरीवाल यांनी दिली.