Ambadas Danve on Mns: मराठवाड्यातील शिवसेनेची पहिला शाखा औरंगाबादेत 8 जून 1985 रोजी स्थापन झाली. या शाखेच्या 37 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या कामाला प्रत्यक्षात तयारी सुरु झाली असून, शिवसेनेकडून आज ( बुधवारी ) सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर स्तंभपूजन करून पूजा करण्यात आली. यावेळी बोलताना शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी मनसेवर नाव न घेता निशाणा साधला आहे. दोन पैसे देऊन सभेला लोकं जमा करायची आम्हाला गरज पडत नाही, असा खोचक टोला दानवेंनी मनसेला लगावला आहे. 


शहरातील ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली, त्याच मैदानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. राज ठाकरे यांनी आपल्या सभेतून हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला होता. राज यांच्या सभेला त्यावेळी झालेली गर्दी सुद्धा चर्चेचा विषय बनला होता. मात्र ही गर्दी पैसे देऊन जमा केल्याचा आरोप त्यावेळी आमदार दानवे यांनी केला होता. तर उद्धव ठाकरेंच्या सभेवर बोलताना, दोन पैसे देऊन सभेला लोकं जमा करायची आम्हाला गरज पडत नाही, असा खोचक टोला दानवे यांनी मनसेला लगावला आहे. 


संघटनात्मक ताकदीच्या बळावर बोलतो..


उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी स्तंभपूजन करून पूजा करण्यात आली. यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, आम्ही दरवर्षी वर्धापनदिनाच्या निमित्ताने दौरे करत असतो. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा आम्हाला मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पंधराशे शाखांची बैठक घेण्यात आली. सगळ्या बूथनिहाय कार्यकर्ते या सभेला येण्याची आमची तयारी सुरु आहे. आमचा पहिला टप्पा मंगळवारी संपला आहे. आमच शक्तिप्रदर्शन नसून, संघटनात्मक ताकदीच्या बळावर आम्ही बोलतो. हवेच्या बळावर आम्ही चालत नाही, कुणाच्या मदतीच्या बळावर चालत नाही, दोन पैसे देऊन आम्हाला लोकं गोळा करायची गरज पडत नाही, असा टोला दानवे यांनी मनसेला नाव न घेता लगावला. 


शिवसेनेकडून जोरदार तयारी... 


राज ठाकरे यांच्या सभेला झालेल्या गर्दीची मोठी चर्चा झाली होती. उद्धव ठाकरेंच्या  सभेला त्यापेक्षा अधिक गर्दी होणार असल्याचा दावा शिवसेना नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे यासाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. गाव,वार्ड,तालुका आणि मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात बैठका घेऊन नियोजन केले जात आहे. तर मराठवाड्यातील शिवसेनेचे मंत्री,खासदार,आमदार आणि महत्वाच्या नेत्यांवर सुद्धा वेगवगेळी जवाबदारी देण्यात आली आहे.