मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपासाठी वाटाघाटी सुरु आहेत. भाजपने आम्ही लोकसभेच्या 32 जागा लढवू असे सांगितल्यानंतर शिंदे गट आणि अजितदादा गटाकडून भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडे नवनवे प्रस्ताव पाठवले जात आहेत. परंतु, अद्याप जागावाटपाचा तिढा काही सुटलेला नाही. या सगळ्यात अजितदादा गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी, 'आम्हाला शिंदे गटाइतक्याच जागा हव्यात', हा धोशा सुरुच ठेवला आहे. परंतु, अजित पवार गटाला शिंदे (Shivsena Shinde Camp) गटाइतक्या जागा द्यायच्या झाल्यास भाजपने आखलेले लोकसभा निवडणुकीचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना छगन भुजबळ यांच्या मागणीला वास्तवाचा आरसा दाखवला आहे.
देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना अजितदादा गटाकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या मागणीविषयी विचारणा करण्यात आली. अजितदादा गटाचे नेते छगन भुजबळ हे सातत्याने 'आम्ही कोणत्याही परिस्थितीत शिंदे गटापेक्षा कमी जागा घेणार नाही, आम्ही त्यांच्याइतक्याच लोकसभेच्या जागा लढवू', असे सांगत आहेत. याविषयी फडणवीसांना विचारले असता त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता म्हटले की, कोणी काही मागायला हरकत नाही. पण लोकसभा जागावाटपाचा निर्णय हा वास्तविकतेवर आधारित होईल, असे फडणवीसांनी म्हटले. फडणवीसांचे हे वक्तव्य पाहता भाजपकडून अजितदादा गटाला त्यांच्याकडे सध्या असलेल्या विद्यमान आमदारांच्या संख्येच्या प्रमाणातच लोकसभेच्या जागा दिल्या जातील, असे दिसत आहे. या जागा निश्चितच शिंदे गटापेक्षा कमी असू शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप शिंदे गटाला लोकसभेच्या 12 ते 13 जागा देऊ शकतो. या आकडेवारीनुसार अजितदादा गटाच्या वाट्याला केवळ तीन ते चार जागा येऊ शकतात. हा प्रस्ताव भाजप अजित पवारांच्या गळी कसा उतरवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
रामदास कदमांना टोकाचं बोलायची सवयच आहे, आमच्यासारखे मॅच्युअर्ड नेते त्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत: देवेंद्र फडणवीस
शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी जागावाटपाच्या मुद्द्यावरुन भाजपला इशारा दिला होता. आम्ही मोठ्या विश्वासाने भाजपसोबत आलो आहोत. भाजपने आमचा केसाने गळा कापू नये, असे रामदास कदम यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, मी इतकी वर्षे रामदास भाईंना ओळखतो. त्यांना अशाप्रकारची वक्तव्यं करायची सवय आहे. त्यांना टोकाची बोलण्याची सवय आहे. कधी ते रागानेही बोलतात. भाजपने नेहमीच शिवसेनेचा सन्मान केला आहे. आम्ही 115 आमदार आहोत, तरीही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. खरी शिवसेना आमच्यासोबत आल्याचे आम्हाला समाधान आहे. त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहोत. आम्ही मित्रपक्षांना सोबत घेऊनच पुढे चाललो आहोत. अनेकवेळा लोक आमचं लक्ष वेधून घ्यायला आणि आपलं महत्त्व पटवून देण्यासाठी टोकाचं बोलतात. पण आमच्यासारख्या मोठ्या आणि मॅच्युअर्ड लोकांनी त्याकडे गांभीर्याने पाहायचं नसते, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी रामदास कदम यांना लगावला.
आणखी वाचा