Lok Sabha 2024 Buldhana: देशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election)आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आयएएस (IAS)अधिकाऱ्याची नियुक्ती त्याच्याच स्वतःच्याच जिल्ह्यात केल्याने ही नियुक्ती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या नियुक्तीमुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांवर याचा प्रभाव पडू शकतो, अशा आशयाची तक्रार आता विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. बुलढाणा (Buldhana)जिल्हा परिषदेच्या सी. ई. ओ. विशाल नरवाडे यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी आता राष्ट्रीय आजाद हिंद संघटना आणि इतर विरोधकांनी केली आहे.


विरोधकांनी नोंदविला आक्षेप


बुलढाणा जिल्ह्यातील धाड या गावचे रहिवासी असलेले आयएएस अधिकारी विशाल नरवाडे हे 2020 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. मात्र एन निवडणुकीच्या काळात म्हणजे एक महिन्यापूर्वीच आयएएस विशाल नरवाडे यांची बदली बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली. खरंतर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कुठल्याही अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला त्याच्या स्वतःच्या जिल्ह्यात निवडणूक काळात नियुक्ती देण्यात येत नसते. असा सक्त नियम असूनही विशाल नरवाडे यांची नियुक्ती निवडणुकीच्या तोंडावरच देण्यात आल्याने आता वादाला तोंड फुटल आहे. त्यामुळे विशाल नरवडे यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी आता राष्ट्रीय आजाद हिंद संघटना आणि  विरोधकांकडून जोर धरू लागली आहे.


विशाल नरवाडे यांचे वडील एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे विशाल नरवाडे यांच्या नियुक्तीने आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांवर प्रभाव पडू शकतो आणि आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ शकतं. त्यामुळे विरोधकांनी राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तक्रार केली आहे. सोबतच अशा आशयाचा मेलद्वारेही राज्य आणि  केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य आदींकडेही तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे विशाल नरवाडे यांच्या बदली संदर्भात नेमके कोणते पाऊल उचलण्यात येईल हे बघणे महत्त्वाचं ठरणार आहे.


2024 लोकसभा निवडणुका कधी होणार ?


लोकसभा निवडणुका 2024 च्या तारखांची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. मागील चार लोकसभा निवडणुका पाहिल्यास एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सुरु झाल्या आहेत. एप्रिल ते मे यादरम्यान सात टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे.  2019 मध्ये  11 एप्रिलपासून निवडणुका पार पडल्या होत्या.  2014 मध्ये सात एप्रिलपासून, 2009 मध्ये 16 एप्रिलपासून तर 2004 मध्ये 20 एप्रिलपासून निवडणुका पार पडल्या होत्या. 


2024 मध्ये 18 लोकसभा निवडणुकीत एप्रिल ते मे यादरम्यान मतदान प्रक्रिया पार पडेल. मार्च ते मे यादरम्यान देशभरातील हवामानही व्यवस्थित मानलं जातं. निवडणुका पाच ते सात टप्प्यात होऊ शकतात. असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या