मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील बुजुर्ग नेता म्हणून ओळख असलेल्या शरद पवार यांनी गुरुवारी लोणावळा येथील सभेत आक्रमक अवतार धारण करत अजितदादा गटाचे आमदार सुनील शेळके यांना इशारा दिला होता. सुनील शेळके यांच्याकडून स्थानिक पातळीवरील शरद पवार गटाच्या नेत्यांवर दबाव आणला जात असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी शेळके (Sunil Shelke) यांना फटकारले. मला 'शरद पवार' म्हणतात, हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही, असा इशाराच शरद पवारांनी (Sharad Pawar) दिला होता. पवारांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असताना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेळके यांचा बचाव केला. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 


यावेळी देवेंद्र फडणवीस यांना शरद पवारांच्या वक्तव्याविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर फडणवीसांनी म्हटले की, पवार साहेब मोठेच आहेत. आज ते इतकी वर्षे राजकारणात आहेत. त्यांना राजकीय क्षेत्रात 55 वर्षे पूर्ण झाली. या स्तराच्या नेत्याने एका साध्या आमदाराला धमकी दिली असेल तर ते योग्य नाही, असे मला वाटते. मी त्यांना सल्ला देण्याइतका मोठा नाही. पण त्यांनी या गोष्टीचा पुनर्विचार केला पाहिजे. शेवटी ते कुठल्या स्तराला आहेत, याचा विचार केला पाहिजे. ते आमदारांना धमक्या द्यायला लागले तर त्यांचा तो स्तर खाली येईल. कोणी आमदार त्यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकी देईल, असे वाटत नाही, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी एकप्रकारे सुनील शेळके यांनी पाठराखण केली. 


शरद पवार नेमकं काय म्हणाले?


मला असं समजलं तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथं येताय म्हणून तुम्हाला धमकी दिली. मी त्यांना सांगू इच्छितो. सुनील शेळके तू आमदार कोणामुळं झाला, तुझ्या सभेला कोण आलं होतं. पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे, हे लक्षात ठेवा. यापुढं असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात, हे विसरू नका. मी त्या वाटेने जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी सुनील शेळकेंवर घणाघात केला होता. एरवी शरद पवार हे संयमी, मार्मिक आणि पातळी न सोडता बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण लोणावळ्यातील त्यांच्या आक्रमक वक्तव्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.


आणखी वाचा


मला 'शरद पवार' म्हणतात, हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही; पवारांचा सुनील शेळकेंना इशारा