अकोला: देशभरात मोठ्या उत्साहात विजयादशमी दसरा (Dasara) साजरा होत असून सकाळपासूनच सर्वजण एकमेकांना विजयादशमीच्या शुभेच्छा देत आहेत. देशातील अनेक भागात विशेषत:उत्तर प्रदेशात आज रावणाचे दहन करण्याची प्रथा आहे. राजधानी दिल्लीतही सेलिब्रिटी व बड्या नेत्यांच्या उपस्थितीत रावण दहन केले जाते.  मात्र, देशात आणि राज्यात रावणदहनाच्या प्रथेवर बंदी आणण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी आज अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात रावणाची महाआरती केली. यावेळी आदिवासी समाज आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे, गेल्यावर्षी दसऱ्या दिनी आमदार अमोल मिटकरींनी सांगोळा गावातील रावण मंदिराचा जिर्णोद्धार करण्याची भूमिका मांडल्यानंतर देशभरात मोठा गदारोळ निर्माण झाला होता. आता, त्यांनी देशात रावण दहन ही प्रथाच बंद करण्याची मागणी केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 


आमदार अमोल मिटकरींच्या हस्ते रावणाची मनोभावे पूजा आणि आरती पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. हे दृष्य रावणाची पुजा करणाऱ्या कोणत्या दाक्षिणात्य राज्यातलं नाही. हे दृष्य आहेय आपल्या महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यातलं. अकोल्यापासून 50 किलोमीटरवर असलेलं पातूर तालूक्यातील सांगोळा हे गाव आहे. या गावाच्या अगदी सुरुवातीलाच एका मंदिरवजा चौथऱ्यावर रावणाची एक अतिशय सुंदर, रेखीव मूर्ती आहे. सुमारे अडीचशे वर्षांची परंपरा या मूर्तीला असून मोठा इतिहास गावाला आहे. 


मिटकरींनी 20 लाखांचा निधीही दिली


राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी आज सांगोळ्यात जात रावणाची महाआरती केली. गेल्यावर्षी त्यांनी आपल्या आमदारनिधीतून 20 लाखांचा निधी मंदिराच्या सभागृह आणि जीर्णोद्धारासाठी दिला होता. त्यानंतर राज्य आणि देशभरात मोठा गदारोळ उडाला होता. आज परत मिटकरींनी सांगोळ्यात येत रावनदहनाच्या परंपरेवर देशभरात बंदीची मागणी केली आहे. आमदार मिटकरींच्या मागणीनंतर या विषयावरून पून्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहेत. सध्या राज्यात आदिवासी संघटनांचा रावणदहनाला विरोध आहे. आता, चक्क विधापरिषद सदस्य असलेल्या आमदार अमोल मिटकरींनी अशी मागणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  


रावणाबद्दल काय म्हणाले मिटकरी


रावणाला जाळणारे रामासारखे पवित्र आहेत का?. 
रावण हा ज्ञानी आणि सत्पुरूष. त्याचातील चांगुलपणावर समाजाचं दुर्लक्ष. 
रावणाने सीतेचं एका बापाच्या भूमिकेतून अपहरण करीत तिला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला होता. 
मागच्या वर्षी मी रावणमंदिराच्या जिर्णोद्धाराचा निर्णय घेतल्यानंतर मला राजकीय अडचण झाली. मला तो निर्णय मागे घ्यावा लागला. 
आता सामजिक संघटनांच्या मदतीने मंदिराचा जिर्णोद्धाराचे प्रयत्न करू.


हेही वाचा


राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..