Pankaja Munde on Manoj Jarange, बीड  : राज्यात आज (दि.12) जवळपास 5 दसरा मेळावे पार पडत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पहिल्यांदाच नारायण गडावर दसरा मेळावा घेत आहेत. तर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा नेहमीप्रमाणे भगवान गडावर पार पडणार आहे. शिवाय, आज सायंकाळी शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा देखील पार पडणार आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याकडे राज्याचे लक्ष असताना पंकजा मुंडे यांनी त्यांच्या मेळाव्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 


पंकजा मुंडे काय काय म्हणाल्या?


पंकजा मुंडे म्हणाल्या, नारायण गडावर मनोज जरांगेंचा आज पहिल्यांदा मेळावा होत आहे. आमचा मेळावा अनेक वर्ष होत आहे, आमचा मेळावा पारंपारिक आहे. मनोज जरांगे काय बोलणार? याची आम्हालाही उत्सुकता आहे. आमचा कार्यक्रम पारंपारिक आहे. आमचा अनेक वर्ष झाले आम्ही करतोय. त्यांचा कार्यक्रम यावर्षी होत आहे. त्यामुळे त्याच्यात काही एकमेकांशी संबंध असण्याचं कारण नाही. माझ्या मेळाव्याला मीडिया कालपासून कव्हर करतोय. माझ्या मेळाव्याला मुस्लिम येणार आहेत, बौद्ध बांधव येणार आहेत. माझ्या मेळाव्याला सर्व जाती धर्माचे लोकं येणार आहे. आमचं दसरा मेळाव्याचं उद्दिष्ट सिम्मोलंघनापर्यंत मर्यादीत आहे. 


पंकज मुंडे पुढे बोलताना म्हणाल्या, भगवान भक्ती गडावर मी गेल्या दहा वर्षापासून दसरा मेळावा करत आहे.  सात वर्षांच्यावर सावरगाव येथे हा मेळावा होत आहे. त्या ठिकाणी आम्ही भगवान बाबांची मूर्ती निर्माण केली आहे. धनंजय मुंडे आणि मी आम्ही एकत्र कधीच दसरा मेळावा केला नाही.  दसरा मेळावा हा  मुंडे साहेबांचा असायचा, आणि आम्ही समोर मांडी घालून बसलेला असायचो, आम्ही काय भाषण करायचो नाही. या भगवानगडावरून मी संदेश देत असते. यावर्षी पहिल्यांदाच नारायण गडावर दसरा मेळावा होत आहे, त्या मेळाव्यात मनोज जरांगे पाटील काय बोलणार याची मलाही उत्सुकता आहे.  मात्र आमचा मेळावा पारंपारिक आहे, तो मेळावा काही पारंपारिक नाही. ओबीसी मराठा संघर्षावर मी माझ्या भाषणात बोलणार आहे. ओबीसी मराठा संघर्ष असा रंग माझ्या मेळाव्याला नसणार आहे.  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच माझा मेळावा येत असतो, मात्र हे काही राजकीय व्यासपीठ नाही.  मात्र माझ्या भाषणातून सामाजिक, राजकीय संदेश नक्की दिला जाईल. राज ठाकरेंचं भाषण मी ऐकलं नाही, त्यामुळे मला माहिती नाही. 


मनोज जरांगे काय काय म्हणाले? 


मनोज जरांगे दसऱ्या मेळाव्याला जाताना म्हणाले, आज विजयादशमीच्या महाराष्ट्रतील जनतेला शुभेच्छा. आत्ता जे काही बोलायचं नारायण गडावरुन  बोलेन. सर्वांनी शांततेत यावं आणि जावं.  कुणी काही केल्याने आपली एकजूट कमी होत नाही. राज्यातील जनता साडेबारा पर्यंत गडावर पोहोचेल. साडेबारा वाजता मी कार्यक्रम सुरू करेन. जे बोलायचं तिथून बोलेन. तिथे किती लोक येतील हे सांगता येणार नाही. मोजणारे मोजतील मेळाव्याला आम्ही काही तयारी केली नाही.  आम्ही गरीब लोक आहोत, मी इथे काहीच सांगणार नाही , असंही मनोज जरांगे यांनी सांगितलं. 


बीड जिल्ह्यात होत असलेल्या पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे यांच्या दसऱ्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तीन जिल्ह्यातून पोलिसांचा मोठा भाऊ फाटा मागविण्यात आला आहे. नारायणगड आणि सावरगाव घाट यासह प्रमुख रस्त्यांवर पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.


नारायणगडावर पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये दसरा मेळावा होत आहे. या दसरा मेळाव्याच्या शुभ मुहूर्तावर नारायण गडावर फुलांची सजावट करण्यात आली आहे. तिकडे दसरा मेळाव्यासाठी मैदानची तयारी सुरू असतानाच नारायण गडावर सुद्धा आलेल्या भाविकांना बुंदीचा प्रसाद बनवण्याचे काम सुद्धा जोरदार सुरू आहे. 





इतर महत्त्वाच्या बातम्या 


Manoj Jarange Patil : धाकटी पंढरी...मनोज जरांगेंच्या नारायण गडावरील दसरा मेळाव्याला तुफान गर्दी