Dasara Melava 2024: विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर आता दसरा मेळाव्याच्या निमित्तानं राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची चिन्हे आहेत. आज दसऱ्याच्या मुहुर्तावर राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 6 दसरा मेळावे होणार असून भगवानगडावर मुंडे आणि नारायणगडावर जरांगे आमनेसामने उभे ठाकणार आहेत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंच्या नेतृत्वातला हा पहिला दसरा मेळावा आहे. बीडमधील नारायणगडावर मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात होणाऱ्या दसऱ्या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून 900 एकरावर लाखोंच्या संख्येने मराठा बांधव नारायणगडावर दाखल होणार असून या दोन्ही मेळाव्यात जरांगे आणि पंकजा मुंडे काय बोलतात याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. 900 एकरावर हा मेळावा होणार असून 500 क्विंटल बुंदीचा महाप्रसाद वाटण्यात येणार आहे.


राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप कायम असून मराठा समाजाला ओबीसीतून (OBC) आरक्षणाची मागणी पूर्ण न झाल्याने उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील अधिक आक्रमक झाले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी आता ते काय भूमिका घेतात याकडे मराठा समाजासह सर्वांचे लक्ष आहे.


जरांगेंच्या निशाण्यावर कोण?


मनोज जरांगे पाटील यांच्या दसऱ्या मेळाव्याच्या भाषणाकडे राज्यातील सर्वांचे लक्ष लागून आहे. आचारसंहितेच्या आगोदर आरक्षण न दिल्यास उमेदवार पाडण्याचा इशारा वारंवार दिल्यानंतर आता दसरा मेळाव्यात त्यांच्या निशाण्यावर कोण असणार हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. दरम्यान, आज बीडमध्ये दोन दसरा मेळावे होणार असून भगवानगडावर आमदार पंकजा मुंडे आणि नारायणगडावर मनोज जरांगे अशी आमनेसामने लढत होणार आहे.


मनोज जरांगेंचा पहिला दसरा मेळावा


मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच मराठ्यांचा दसरा मेळावा होत असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. बीड जवळील नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे. या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून भाषणाचे व्यासपीठ तयार झाले आहे. नारायण गडावरील तब्बल 900 एकरवर हा दसरा मेळावा होत असून जवळपास 200 एकरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली.


वैद्यकीय कक्षांसह 500 क्विंटल बुंदीचा प्रसाद


10 वैद्यकीय कक्ष उभारण्यात आले असून ज्या सुविधा आयसीयु विभागात दिल्या जातात, त्याच सुविधा या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. 100 पेक्षा जास्त रुग्णवाहिका तैनात असणार आहेत. येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता, तब्बल 200 एकरवर पार्किंकची व्यवस्था असणार आहे. मनोज जरांगेंचा दसरा मेळावा दुपारी 1 वाजताच्या सुमारास होणार आहे. 900 एकरावर हा मेळावा होणार असून 500 क्विंटल बुंदीचा महाप्रसाद वाटण्यात येणार आहे.