Ajit Pawar On Dasara 2024 मुंबई: यंदाची विजयादशमी आपल्या सर्वांच्या जीवनात यश, किर्ती, सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद, उत्साह घेऊन येवो. राज्यावरील नैसर्गिक संकटे तसंच समाजातील अज्ञान, अन्याय, अंधश्रद्धा दूर होवोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दसरा, विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, विजयादशमी अर्थात दसरा हा आपल्या सर्वांसाठी आनंदाची, स्नेहाची लयलूट करण्याचा सण आहे. विजयादशमी म्हणजे समाजातील दुष्प्रवृत्तींचा विनाश करुन सत्प्रवृत्तींचा विजय साजरा करण्याचा दिवस आहे. असत्यावर सत्याने, अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने, अशाश्वतावर शाश्वताने विजय मिळवण्यासाठी कटिबद्ध होण्याचा दिवस आहे, असं अजित पवारांनी सांगितले.
सत्याचा नेहमीच विजय होत असतो- अजित पवार
सत्याचा नेहमीच विजय होत असतो, हा विश्वास या सणाच्या माध्यमातून मिळतो. दसऱ्याच्या दिवशी आपण धन, ज्ञान, भक्ती, शक्तीची पूजा करतो. नवरात्रीच्या पवित्र पर्वानंतर येणारा दसरा हा सण आपल्या गौरवशाली संस्कृतीचे एक प्रतीक आहे. हा चैतन्यदायी सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात निश्चितपणे आनंद घेऊन येईल, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला.
लोकहिताच्या योजना पात्र घटकांपर्यंत पोहोचविण्याठी प्रयत्न करुया-अजित पवार
राज्यातील बळीराजा, महिला, युवक यांच्यासह वंचित-उपेक्षितांच्या आयुष्यात सुखाचे, आनंदाचे दिवस यावेत, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. विविध घटकांसाठी शासनाने अनेक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केल्या असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु आहे. यंदाच्या दसऱ्याच्या निमित्तानं राज्याच्या हितासाठी, सर्व समाजघटकांच्या विकासासाठी आपण सारे एकत्र येऊया. राज्य शासनाने सुरु केलेल्या लोकहिताच्या योजना पात्र घटकांपर्यंत पोहोचविण्याठी प्रयत्न करुया, असे आवाहनही अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केले आहे.
रामराजे नाईक निंबाळकरांची स्मार्ट खेळी-
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशा चर्चा सुरु आहेत. मात्र, रामराजे निंबाळकर स्मार्ट खेळी करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनाही खूश करण्याच्या तयारीत आहेत. रामराजे निंबाळकर हे अजित पवारांसोबतच राहणार आहेत. तर त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि फलटण कोरेगावचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. फलटण येथे रामराजे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती आहे.