Sanjay Raut on Bhaskar Jadhav : शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी काही दिवसांपूर्वी राजकीय संन्यासाचे संकेत दिले होते. "आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर आता थांबायचा विचार करावा, असं वाटतं," असे त्यांनी म्हटले होते तर महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेनेतून मंत्रिपदाची संधी न मिळाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती. आता भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसने खळबळ उडवली आहे. “दिव्याला तेलाची गरज तो तेवत असताना असते. दिवा विझल्यावर टाकलेल्या तेलाला अर्थ राहत नाही,” असे सूचक स्टेटस त्यांनी ठेवले आहे. नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधवांनी असे संकेतपूर्ण स्टेटस ठेवल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना चांगलेच उधाण आले आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

संजय राऊत म्हणाले की, चांगली वाक्य आहेत. इंटरेस्टिंग वाक्य आहेत. भास्कर जाधव हे चांगले वाचक आहेत. त्यामुळे त्यांची भाषा अत्यंत वैभवशाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अनेक नेत्यांना स्थान मिळाले नाही. सुनील राऊतांना देखील स्थान मिळाले नाही. त्यांचा हक्क होता म्हणून आम्ही रडत बसलो का? पक्षाची भूमिका आहे. सरकार आणण्यासाठी आमच्या कुटुंबाचं योगदान होतं. पण सुनील राऊतांना मंत्रिमंडळात घेतले नाही. मोजक्या जागा असतात, तीन पक्षाचे सरकार होते. आपण समजून घेतले पाहिजे. आमच्यापेक्षा विद्वान लोक मंत्रिमंडळात गेले आणि ते सोडून गेले. चाणाक्ष, हुशार, तडफदार असे अनेक होते. त्यांना मंत्रीमंडळात घेण्याचा पक्षाने निर्णय घेतला आणि आम्ही त्या निर्णयात सहभागी होतो, असे त्यांनी म्हटले.  

भास्कर जाधवांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करावी

संजय राऊत पुढे म्हणाले की, ते ज्येष्ठ नेते आहेत. आमचे सहकारी आहेत. त्यांनी येऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली पाहिजे. बाहेरून मतवर व्यक्त करण्यापेक्षा अशा वेळेला स्वतः येऊन बोलावे. आम्ही सुद्धा बोलतो. आम्हाला जर एखाद्या विषयावर चर्चा करावीशी वाटली तर आम्ही स्वतः येऊन भेटतो आणि चर्चा करतो, असेही त्यांनी म्हटले. 

संजय राऊतांची अजित पवारांवर टीका

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पॅनलला मोठे यश मिळालं. 21 पैकी 20 जागांवर अजित पवार यांच्या पॅनलचा विजय झाला आणि शरद पवारांच्या पॅनलचा पराभव झाला. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, एका कारखान्याचे चेअरमन राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री बनतात हे ऐतिहासिक गोष्ट आहे. पाचशे कोटी रुपयांचे आमिष दाखवले. हे 500 कोटी रुपये अजित पवार आपल्या खिशातून देत आहेत का? हे पाचशे कोटी रुपये तुम्ही सरकारच्या तिजोरीतूनच देणार आहात. बाकी इतर सर्व प्रकल्प तुम्ही रोखून ठेवलेले आहेत. त्याला पैसे नाहीत, राज्यावर कर्जाचा भार वाढतोय. पण, आपल्या एका गावातल्या कारखान्यासाठी ते पाचशे रुपये कोटी रुपये द्यायला तयार आहेत. यालाच साध्या सोप्या भाषेत सरकारी पैशाचा अपव्यय आणि भ्रष्टाचार म्हणतात, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली.  

आणखी वाचा

Bhaskar Jadhav: दिवा विझल्यावर तेल टाकून फायदा नसतो! भास्कर जाधवांच्या स्टेटसमुळे ठाकरे गटात खळबळ, तर्कवितर्कांना उधाण