सांगली : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडी यांच्यात काही जागांवर टोकाचे मतभेद झाले आहेत. बारामतीसारख्या (Baramati) जागेबाबत तर काही नेते कोणत्याही परिस्थिती लोकसभा निवडणूक लढवणारच, अशा पवित्र्यात आहेत. त्यामुळे पक्षनेतृत्वाची चांगलीच पंचाईत झाल्याचं पाहायला मिळतंय. असे असतानाच आता सांगलीची (Sangli Constituency) जागाही चर्चेचा विषय ठरत आहे. या जागेसाठी ठाकरे यांची शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेस (Congress) हे दोन्ही पक्ष उत्सूक असून येथे स्थानिक नेतृत्वात टोकाचे मतभेद पाहायला मिळतायत. त्याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackerya) जनसंवाद मेळाव्यावर काँग्रेसने येथे थेट बहिष्कार टाकलाय. 


काँग्रेसकडून मेळाव्यावर बहिष्कार 


माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर आहेत. ते येथील मिरजेत जनवसंवाद मेळाव्यात बोलणार आहेत. आपल्या भाषणात ते सांगलीबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. ते यावेळी उमेदवाराची घोषणा करणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे. असे असतानाच त्यांच्या या जनसंवाद मेळाव्यावर काँग्रेसने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसं पाहायचं झाल्यास काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना हे महाविकास आघाडीचा भाग आहेत. या दोन्ही पक्षांसह शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्षदेखील एकदीलाने या निवडणुकीला सामोरे जात आहेत. एकीकडे आम्ही एकत्र आहोत, असे या पक्षांकडून सांगितले जात असताना सांगलीत काँग्रेसने ठाकरेंच्या मेळाव्यावर थेट बहिष्काराची भूमिका घेतल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 


काँग्रेसने आमंत्रण फेटाळले


काँग्रेसच्या या भूमिकेमुळे सध्या सांगली जागावेरून महाविकास आघाडीत तणाव वाढला आहे. महाविकास आघाडीचा घटकपक्ष म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसला मिरजेतील मेळाव्याचे निमंत्रण पाठवले होते. मात्र हे निमंत्रण काँग्रेसने नाकारले आहे. जागेचा तिढा कायम असताना मेळाव्याला स्थानिक काँग्रेस पक्षाची उपस्थिती योग्य नाही अशी भूमिका काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत घेतली आहे. दुसरीकडे हेच आमंत्रण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वीकारले आहे. त्यामुळे या मेळाव्याला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.  


सांगली मतदारसंघाचा नेमका तिढा काय? 


सांगली मतदारसंघासाठीचा तिढा अद्याप कायम आहे. या जागेवर काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. कोल्हापुराच्या बदल्यात सांगली ही जागा आमच्याकडे असेल अशी शिवसेनेची भूमिका आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी नुकतेच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेकडून चंद्रहार पाटील यांना येथे उमेदवारी दिली जाईल असे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे सांगली ही जागा आमच्याकडेच राहावी अशी काँग्रेसची मागणी आहे. त्यामुळे नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाची ठरणार आहे.