Maharashtra Assembly Election 2024 नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) अनुषंगानं काँग्रेस पक्षानं 288 विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं आगामी विधानसभा निवडणूक लढू इच्छिणाऱ्या काँग्रेस (Congress) पक्षातील उमेदवारांचे अर्ज मागविले आहेत. भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीनं जिल्ह्यातील भंडारा, साकोली आणि तुमसर या तीन विधानसभा क्षेत्रासाठी निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविलेत. विशेष म्हणजे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)  यांनी सुद्धा स्वतःसाठी साकोली विधानसभा क्षेत्र मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार काँग्रेस पक्षाकडं अर्ज सादर केला आहे. त्यामुळे एकप्रकारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला असल्याचे बोलले जात आहे.  


पक्षाकडं 20 हजारांचा डीडीसह अर्ज दाखल 


साकोली विधानसभा मतदारसंघातून नाना पटोले यांचा एकमेव अर्ज भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीकडं प्राप्त झाला आहे. या अर्जासोबत नानांनी पक्षादेशाप्रमानं 20 हजार रुपयांचा डीडी पक्षाला दिला आहे. भंडारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पवन वंजारी यांच्याकडं नाना पटोले यांचा अर्ज त्यांचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी आणि स्विय सहाय्यक राजू पालीवाल यांनी सादर केलाय. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. तर, भंडारा विधानसभेसाठी 11 तर, तुमसर विधानसभेसाठी 6 असा जिल्ह्यातील तीन विधानसभेसाठी 18 जणांनी काँग्रेस पक्षाकडं उमेदवारी मागितली आहे.


काँग्रेसचे प्रदेश प्रभारी यांच्यासह ज्येष्ठ नेते 10 ऑगस्टपासून दौऱ्यावर


मराठवाडा आणि विदर्भांत मिळून एकूण 10 जिल्हानिहाय बैठका घेण्याचं नियोजन असून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या नेतृत्वात स्थानिक जिल्हा पदाधिकार्‍यांसोबत या बैठका होणार आहेत. या बैठकांमध्ये काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्यातील अनेक काँग्रेसचे प्रमुख नेतेही या बैठकीत सहभागी होणार आहेत. येत्या 10, 11 आणि 12 ऑगस्ट रोजी लातूर, नांदेड आणि संभाजीनगर या ठिकाणी  मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांसाठीच्या बैठका होणार असल्याचीही माहिती पुढे आली आहे. तर 13 ऑगस्ट रोजी बुलढाणा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यासाठी तर 14 ऑगस्टला रोजी  अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी ची बैठक पार पडणार आहे. 


या बैठकांच्या माध्यमातून काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला आणि राज्य काँग्रेसमधील वरिष्ठ काँग्रेस नेते कार्यकर्त्यांच्या मनातील गोष्टी जाणून घेणार आहेत. तसेच स्थानिक पातळीवर विविध मतदारसंघात पक्षाची रणनीती काय असावी, या संदर्भातही मंथन करणार आहेत.


हे ही वाचा