Arjun Modhwadia Joins BJP: आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये काँग्रेसला (Gujarat Congress) मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे महत्वाचे नेते अर्जुन मोढवाडिया (Arjun Modhwadia) यांनी आज काँग्रेसचा 'हात' सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून राजीनामे देण्यात आले आहेत. असे असतानाच अर्जुन मोढवाडिया यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे अर्जुन मोढवाडिया यांनी कालच काँग्रेसचा राजीनामा दिला होता. महाराष्ट्रातील अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या भाजप प्रवेशानंतर अर्जुन मोढवाडिया यांच्या रूपाने गुजरातमध्ये काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. 


काल राजीनामा अन् आज पक्षप्रवेश...


पोरबंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन मोढवाडिया यांनी कालच गुजरात विधानसभेचे अध्यक्ष शंकर चौधरी यांच्याकडे राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे 182 सदस्य असलेल्या गुजरात विधानसभेत आता विरोधी पक्षाचे संख्याबळ 14 वर आले आहे. गुजरातच्या सर्वात ज्येष्ठ आणि प्रभावशाली विरोधी नेत्यांपैकी एक असलेल्या मोढवाडिया यांनी 2022 च्या निवडणुकीत पोरबंदर विधानसभा मतदारसंघात भाजपचे दिग्गज बाबू बोखिरिया यांचा पराभव केला होता. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' 7 मार्च रोजी गुजरातमध्ये दाखल होणार आहे. त्यापूर्वी मोढवाडिया यांचा पक्षप्रवेश करून भाजपने काँग्रेस धक्का दिला आहे. 


कोण आहेत अर्जुन मोढवाडिया?



  • चाळीस वर्षे काँग्रेस सोबत

  • विद्यार्थीदशेपासून महाविद्यालयीन राजकारणात

  • सौराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य

  • गुजरात मैरीटाईम बोर्डात अभियंता

  • 1993 साली नोकरी सोडून पूर्णवेळ राजकारणात

  • काँग्रेसचे गुजरात प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं

  • 2004 ते 2007 काँग्रेसच्या वतीने गुजरातचे विरोधीपक्ष नेते

  • 2008 ते 2009 गुजरात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता

  • 2022  साली पोरबंदर विधानसभा मतदारसंघातून आमदार


राजीनाम्यानंतर मोढवाडिया यांची प्रतिक्रिया?


राजीनामा दिल्यानंतर अर्जुन मोढवाडिया यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. गांधीनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "आज मी गुजरात काँग्रेसच्या प्रत्येक पदाचा राजीनामा दिला आहे, मी विद्यार्थी असल्यापासून आजपर्यंत काँग्रेसशी संबंधित होतो. काँग्रेसमधून राजकारणाला सुरुवात केल्यानंतर विधानसभा सदस्य ते विरोधी पक्षनेते पदावर काम केले. सोबतच मी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद देखील सांभाळले आहे. मी रक्त आणि घाम गाळून पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न केला.पण ज्या विचाराने मी काँग्रेसमध्ये आलो ते मागील काही वर्षात दिसत नव्हते. काँग्रेस पक्ष जनतेपासून दूर गेला आहे. मी अनेकवेळा याबाबत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात मी अपयशी ठरलो. त्यामुळे मी काँग्रेसच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे" मोढवाडिया म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या :


Lok Sabha Elections 2024 Date : मोठी बातमी : लोकसभा निवडणुकीसाठी 7 टप्प्यात मतदानाची शक्यता, 14-15 मार्चला तारखा जाहीर होणार?