मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारांची (BJP Candidate) पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, या यादीत महाराष्ट्राचा समावेश नाही. त्याचं कारण म्हणजे राज्यातील काही मतदारसंघावरून भाजप-शिंदेसेनेत एकमत होय नसल्याचे चित्र आहे. ज्यात आठ अशी प्रमुख मतदारसंघ आहेत, ज्यावरून भाजप-शिंदेसेनेत संघर्षाची ठिणगी पडली असल्याचे पाहायला मिळत आहे. युतीत नेहमी शिवसेनेला मिळणाऱ्या अनेक लोकसभा जागांवर भाजपचा डोळा आहे. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपाचे घोडे अडले असल्याची चर्चा आहे. अशात आज अमित शाह (Amit Shah) रात्री मुंबईत असणार असून, यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. 


छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ (Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency) 


आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ भाजप-शिवसेना युतीत शिवसेनेकडे असायचा. मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे याच मतदारसंघातून निवडून यायचे. दरम्यान, 2019 ला त्यांचा पराभव झाला. त्यामुळे यंदा भाजपने या मतदारसंघावर दावा केला आहे. पण शिंदेसेनाही याच जागेसाठी आग्रही आहे. 


कल्याण लोकसभा मतदारसंघ (Kalyan Lok Sabha Constituency)


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. मात्र, आता भाजपने देखील या जागेवर दावा केला आहे. यावरून दोनही पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये अनेकदा वाद देखील पाहायला मिळाला.


दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ (South Mumbai Lok Sabha Constituency)


भाजप-शिवसेना युतीत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ नेहमी शिवसेनेकडे गेला आहे. याच मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत विद्यमान खासदार आहेत. मात्र, मतदारसंघातील पारंपरिक मतांमुळे ही जागा नेहमीप्रमाणे शिवसेनेलाच मिळावी असे म्हणत शिंदेसेनेचा या जागेवर दावा आहे.  असे असतांना भाजपने इथूनही तयारी सुरू केली असल्याची चर्चा आहे. 


हिंगोली लोकसभा मतदारसंघ (Hingoli Lok Sabha Constituency)


मराठवाड्यातील हिंगोली लोकसभा मतदारसंघावरून देखील भाजप-शिंदेसेनेत रस्सीखेच असल्याचे पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात सध्या विद्यमान खासदार शिंदे गटाचे हेमंत पाटील आहेत. पण आता ही जागा भाजपला हवी असून, स्थानिक आमदार त्यासाठी मुंबईत तळ ठोकून असल्याचे पाहायला मिळत आहे.


रामटेक लोकसभा मतदारसंघ (Ramtech Lok Sabha Constituency)


इतर मतदारसंघाप्रमाणे रामटेक लोकसभा मतदारसंघात देखील शिवसेना-भाजप दावे-प्रतिदावे पाहायला मिळत आहे. शिंदेसेनेचे कृपाल तुमाने हे सध्या या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. मात्र, शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर शिवसेनेची ताकद याठिकाणी राहिली नसल्याचा दावा करत भाजपने या जागेवरही दावा ठोकलाय.


रायगड लोकसभा मतदारसंघ (Raigad Lok Sabha Constituency) 


रायगड लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत रस्सीखेच असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण येथे अजितदादा गटाचे नेते सुनील तटकरे विद्यमान खासदार आहेत. दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री उदय सामंतांच्या बंधूंचीही इथूनच दावेदारी असल्याची चर्चा आहे. 


पालघर लोकसभा मतदारसंघ (Palghar Lok Sabha Constituency)


पालघर लोकसभा मतदारसंघात सध्या विद्यमान खासदार शिंदेसेनेचे राजेन्द्र गावित आहेत. विशेष म्हणजे गेल्यावेळी ते भाजपतूनच शिवसेनेत गेले होते. जागावाटपावेळी ही अंतर्गत तडजोड करण्यात आली होती. त्यामुळे ही जागा आमचीच असल्याचा भाजपचा दावा असल्याचे पाहायला मिळत आहे. 


सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ (Sindhudurg Lok Sabha Constituency)


सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून भाजप-शिंदेसेनेत सर्वाधिक वाद पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखा जातो आणि याच मतदारसंघावर शिंदे गटाने दावा केला आहे. भाजप-शिवसेना युतीत देखील हा मतदारसंघ नेहमी सेनेकडेच राहिला आहे. सध्या उद्धव ठाकरे गटाचे विनायक राऊत येथील विद्यमान खासदार आहेत. मात्र, नारायण राणेंसाठी भाजपला हा मतदारसंघ हवा असून, त्यांनी देखील यावर दावा केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Amit Shah : अमित शाह आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, मुंबईंत मुक्काम; महायुतीच्या जागावाटपावर होणार चर्चा