शिर्डी: लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असून चौथ्या टप्प्यात होणाऱ्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात आरोप प्रत्यारोपांनी निवडणूक रंगात आली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) यांच्या प्रचारार्थ आज बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेर तालुक्यात जाहीर सभा संपन्न झाली. या सभेला नांदेड येथील महविकास आघाडीचे नेते यशपाल भिंगे (Yashpal Bhinge) हे देखील उपस्थित होते. संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे प्रचाराचा नारळ फोडत महाविकास आघाडीची सभा संपन्न झाली. यावेळी महाविकास आघाडी पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी झालेल्या सभेत नांदेड जिल्ह्यातील नेते यशवंत भिंगे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडले. तसेच मोदी यांची नक्कल करत भाजप सरकारवर टीका केली. यानंतर बाळासाहेब थोरात यांनी देखील नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसह राज्यातील जागा वाटपावर भाष्य करत महायुतीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले.


बाळासाहेब थोरातांचा वाकचौरेंना अनुभवाचा सल्ला


संगमनेरातून लीड देण्याची जबाबदारी आमच्या कार्यकर्त्यांची आहे. पण तीन लाखांच्या मताधिक्याने निवडून येईन, हे बोलू नका. आपल्याला लढावं लागणार आहे. तीन लाख म्हटलं की आमचा गडी थंड होतोय, पळत नाही जास्त. त्यामुळे वाकचौरे गैरसमजात राहू नका, कृपा करा आमच्यावर. तुम्ही निवडून येणार आहे मात्र लोकांना समजून सांगावं लागेल. त्यामुळे तीन लाख-तीन लाख या चर्चा करू नका, असा सल्ला बाळासाहेब थोरात यांनी वाकचौरे यांना दिला. 


अनेकांना वाटतं मी जागावाटपात काँग्रेससाठी भांडलोच नाही, बाळासाहेब थोरातांनी खंत बोलून दाखवली


शिर्डीची जागा शिवसेनेच्या वाटेला गेली. अनेकांना वाटलं मी भांडलोच नाही. मात्र शिवसेनेने आमच्या 14 खासदारांच्या जागा आमच्याच हा पक्का निर्धार केला होता. एक जागा त्यांनी कोल्हापूरची महाराजांसाठी सोडली तर आमची सांगली गेली.. त्यामुळे शिवसेना सुद्धा त्यांच्याकडे गेली. जरी शिवसेनेचा खासदार झाला तरी पाठिंबा काँग्रेसलाच, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. तसेच मला राज्यभरातून सभांसाठी अनेक ठिकाणांहून निमंत्रण येत असल्याचेही त्यांनी म्हटले. आपल्याला चांगली डिमांड आहे. नगरमध्ये पण आपण गेलेले आहोत. गणेश कारखान्यात जसं झालं आणि आता तो चांगला चालायला लागला तसंच दक्षिण लोकसभेत देखील आपण लक्ष घालतोय, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.


गेल्यावेळी अशोक चव्हाण माझ्यामुळे निवडून आले: यशपाल भिंगे


मागच्या निवडणुकीत माझ्यामुळेच नांदेडला भाजपचा खासदार निवडून आला.. यावेळी मात्र शड्डू ठोकून उभा राहिलो आणि माझ्यामुळे निवडून आलेल्याला पाडायचं असे आवाहन केले. आपल्या उमेदवाराचं नाव वाघचौरे आहे, लोक कोंबड्या चोर, पक्ष चोरतात , लोक चिन्ह चोरतात इतकच नव्हे तर लोक काकाही सोडतात आणि बापही चोरतात, असे यशपाल भिंगे यांनी म्हटले.


राज्यपाल नियुक्त 12 जणांच्या यादीत माझं नाव होते.मात्र, काळया  टोपीखालचा काळा मेंदू त्याने बाराच वाजवले. एका बाजूला हे बेनं आणि दुसऱ्या बाजूला माजी राज्यपाल मलिक किती फरक आहे दोघांमध्ये, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मोदी हे गारुडी आहेत. माणसं जमा करतात आणि बोलत राहतात. ते चालतं कसं तेही बघा.. ( मोदींची नक्कल करत टीका ) अरे काय 90 मारून येतोस... का गावातला गावगुंड आहेस, अशी बोचरी टीका यशपाल भिंगे यांनी केली. 


आणखी वाचा


शिर्डीचे मविआचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे कोट्यधीश, पत्नीही साडेतीन कोटीची मालकीण