बीड : राज्यातील सर्वाधिक लक्ष्यवेधी ठरलेल्या मतदारसंघांपैकी एक असलेल्या बीडमध्ये मोठी घडामोड घडली आहे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेल्या माजी मंत्री प्रा. सुरेश नवले  (Suresh Navale ) यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला आहे. बीडचे बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांना सुरेश नवले यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बजरंग सोनवणे यांची ताकद वाढली असून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासाठी तो धक्का असल्याचं बोललं जातंय.  एकनाथ शिंदे यांच्याकडे लाभार्थ्यांची गर्दी होत असल्याने निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत सुरेश नवले यांनी शिंदेंच्या शिवसेनेला रामराम केला होता.


उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांनी नवीन सरकार स्थापन केलं आणि त्यांच्यासोबत बीडचे माजी मंत्री सुरेश नवले हे देखील गेले होते. मात्र आता शिंदे यांच्या शिवसेनेत निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत सुरेश नवले यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. बीडमध्ये शरद पवार गटाचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना त्यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. 


आगामी विधानसभा लढवण्याचा नवलेंचा निर्धार


आगामी काळात विधानसभेची निवडणूकदेखील बीडमधून लढवणार असल्याचं सुरेश नवले यांनी जाहीर केलं आहे. माजी मंत्री सुरेश नवले यांनी बीडमध्ये एक कार्यकर्ता मेळावा घेतला आणि या मेळाव्यामध्ये ही घोषणा केली. सध्या सत्ता मिळाल्याने मुख्यमंत्र्यांकडे अनेक लाभार्थ्यांची गर्दी होत आहे, मात्र पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काहीच काम होताना दिसत नाही. त्यामुळे अनेकजण नाराज असून आम्ही शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे अशी प्रतिक्रिया सुरेश नवले यांनी दिली आहे. 


शिंदे लाभधारकांच्या गराड्यात अडकलेत


मुख्यमंत्री फक्त लाभधारकांच्या गराड्यात अडकलेत असा आरोप करत प्रा. सुरेश नवले म्हणाले की, "आढळराव पाटलांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, राष्ट्रवादीसाठी त्यांना तिकडून उमेदवारी मिळवावी लागली हे किती वाईट चित्र महाराष्ट्रात जात आहे. भाजप मुख्यमंत्र्याचा हक्क हिरावून घेत आहे. मुख्यमंत्री आता फक्त लाभधारकांच्या गराड्यातमध्ये दिसत आहेत. त्यांच्याभोवती सर्व लाभधारकांचा गराडा असतो. पण त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही.


मी प्रभू रामचंद्राला साकडं घालतो, मित्रपक्षापासून मुख्यमंत्र्यांचे संरक्षण झालं पाहिजे, तरच शिवसेनेला भवितव्य आहे. जर मित्र पक्षाच्या दबावाखाली शिवसेना अशीच वागत राहिली तर प्रभुरामचंद्र या पक्षाला वाचवो असंही नवले म्हणाले. 


ही बातमी वाचा: