बीड: जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या ठेवीदारांचे राज्यातील 52 शाखांमध्ये 3,750 कोटी रुपये अडकले आहेत. हे पैसे परत मिळावेत यासाठी ठेवीदार आंदोलन करत आहेत. ज्ञानराधाचा प्रमुख आणि उद्योजक सुरेश कुटे विरोधात राज्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल झालेले आहेत. तरीही अजूनही भाजपमध्ये कुटे यांना कायम ठेवण्यात आले होते. याबाबत एका ठेवीदाराने थेट माजी खासदार किरीट सोमय्या यांना फोन जाब विचारला. तसेच आमच्या ठेवी कधी मिळतील, असे विचारले. त्यावर तुमची एक दमडीही मिळणार नाही.  मी खोटे आश्वासन देत नाही, असे सांगून सोमय्यांनी हात झटकले. मात्र, दुसऱ्याच दिवशी कुटेची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्र मात्र जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आता सुरेश कुटे यांची भाजपामधून हकलपट्टी करण्यात आली आहे. 10 नोव्हेंबर 2023 रोजी सुरेश कुटे यांनी सहपरिवार भाजपामध्ये प्रवेश केला होता.
 
ज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळा राज्यात प्रचंड गाजला होता. काही दिवसांपूर्वीच ईडीने ज्ञानराधाच्या विविध शाखांवर छापे टाकले होते. यावेळी घेतलेल्या झाडाझडतीत सुरेश कुटे (Suresh Kute) याने ठेवीदारांचे पैसे हाँगकाँगला नेल्याचे ईडीच्या (ED) तपासातून समोर आले होते. या पतसंस्थेचे तब्बल 3 लाख 70 हजार ठेवीदार आहेत. या खातेदारांचे जवळपास 3700 कोटी रुपये या पतसंस्थेत अडकले आहेत. ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या (Dnyanradha Multistate co operative society ltd) 50 शाखांचे आर्थिक व्यवहार गेल्यावर्षीपासून ठप्प आहेत. त्यामुळे ठेवीदारांची आयुष्यभराची पुंजी पतसंस्थेत अडकून पडली आहे.


या सगळ्याबाबत सुरेश कुटे याला विचारले असता त्याने मी ठेवीदारांचे सर्व पैसे परत देईन, असा दावा केला आहे. परदेशातून दहा हजार कोटींची गुंतवणूक आल्यानंतर ठेवीदारांचे पैसे दिले जाणार असल्याचा दावा सुरेश कुटे याने अलीकडेच केला होता.  सुरेश कुटे यांचा तिरुमला (Tirumala) उद्योग समूह महाराष्ट्रामधील एक आघाडीचा उद्योगसमूह आहे. खाद्यतेल, दुग्ध जन्य पदार्थ , हेअर ऑईल , वाहनांचे सुटे पार्ट ,पेंड उद्योगातील प्रमुख नाव म्हणून बीडचा तिरुमला ग्रुप ओळखला जातो. बीड जिल्ह्यात सुरेश कुटे हे मोठं प्रस्थं होतं. सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांनी गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. 


आणखी वाचा


आयकर छापेमारी, कुटेंचा भाजप प्रवेश; बावनकुळे म्हणतात आमचा पक्ष 'ओपन'


ठेवीदारांचे पैसे हाँगकाँगला कसे पळवले? ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणाचे सुरेश कुटेंची ईडीकडून कसून चौकशी