Nagpur News नागपूर : उपराजधानी नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavi) यांच्या विरोधात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) नागपूरच्या दक्षिण- पश्चिम मतदारसंघातून लढतील, अशा चर्चा रंगल्या आहेत. तर पक्षाने संधी दिल्यास मी नक्कीच या मतदारसंघातून लढेल, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी शरद पवार गाटाचे नेते अनिल देशमुख यांनी बोलताना व्यक्त केली आहे. असे असतानाच या मतदारसंघातून आपल्यालाच उमेदवारी मिळणार असल्याचा विश्वास काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे पाटील (Prafulla Gudadhe) यांनी बोलताना व्यक्त केला आहे.  


या परिसरातून मी महापालिकेत चार वेळेला नगरसेवक असून 2014 ची विधानसभा निवडणूक ही फडणवीस विरोधात लढवली होती. या वेळेला पुन्हा पक्षाकडे उमेदवारी मागितली असून मला पूर्ण विश्वास आहे की काँग्रेस पक्ष या मतदारसंघातून मला उमेदवारी देईल असेही प्रफुल्ल गुडधे म्हणाले.


'त्या' कडे आम्ही मनोरंजन म्हणून पाहतो- प्रफुल्ल गुडधे 


माजी गृहमंत्री अनिल देशमुख नागपूरच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून लढतील, अशा चर्चा रंगल्या आहेत. यावर बोलताना प्रफुल्ल गुडधे म्हणाले की, विधानसभा निवडणूक जवळ येत असताना अशा गॉसिपिंग खूप होतील, व्हीआयपी मतदारसंघात अशा गोष्टी प्लांट करण्याचं काम भाजप करत असते. सध्या या सर्व बातम्या भाजपकडून पेरल्या जात असून त्याकडे आम्ही मनोरंजन म्हणून पाहतो, अशा शब्दात नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी मागणाऱ्या प्रफुल्ल गुडधे यांनी अनिल देशमुख यांच्या फडणवीस विरोधातील संभाव्य उमेदवारीच्या चर्चेची खिल्ली उडवली आहे.


उपमुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असल्याने आमच्याकडे अनेक मुद्दे


सध्या मतदारांसोबत आमच्या भेटीगाठी सुरू आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते ही कामाला लागले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असल्याने आमच्याकडे अनेक मुद्दे असून स्वाभाविकरित्या लढत रंगतदार होईल, असा दावा ही गुडधे यांनी केलाय. लोकसभेमध्ये सेमी फायनल झाली असून भाजपचा 1 लाख मतांच्या मताधिक्यांचा दावा आम्ही 33 हजारापर्यंत खाली आणला. तेव्हा मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर गोंधळ होता, नाही तर 33 हजारांचा मताधिक्य देखील मिळाला नसता, असा दावाही गुडधेनी केला. यंदा, मात्र प्रशासनाचा गैरवापर सत्ताधारी पक्षाला करू देणार नाही. असेही ते म्हणाले. 


देवेंद्र फडणवीस 25 वर्ष आमदार, तरी फारसा बदल घडवू शकले नाही


नागपूरातील महापुराचा मुद्दा, सोबतच बेरोजगारी हा ही मुद्दा आहे. 25 वर्ष आमदार राहिलेले आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पद भूषवणारे देवेंद्र फडणवीस एवढ्या वर्षात या मतदारसंघात फारसा बदल घडवू शकले नाही, हा मुद्दा आम्ही मतदारांपर्यंत नेऊ असे ही गुडधे म्हणाले. दरम्यान, दक्षिण पश्चिम नागपूर मध्ये उमेदवारी कोणत्या पक्षाला द्यायची, याचा निर्णय महाविकास आघाडी मिळून करेल आणि जो कोणी उमेदवार दिला जाईल त्याच्या पाठीशी महाविकास आघाडीचे सर्व नेते ताकतीने उभे राहतील असे ही ते म्हणाले. 


हे ही वाचा