मुंबई: आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी काही तासांसाठी दिल्लीला जाणार आहेत. ते एका कृषी सन्मान सोहळ्यासाठी दिल्लीला जाणार असले तरी यावेळी त्यांच्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी होणाऱ्या गाठीभेटींकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दिल्लीतील कार्यक्रम आटोपल्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा तब्बल अडीच तासांचा वेळ राखून ठेवण्यात आला आहे. याचवेळेत एकनाथ शिंदे हे भाजपच्या (BJP) वरिष्ठ नेत्यांना भेटतील, असे सांगितले जात आहे.


एकनाथ शिंदे हे बुधवारी दुपारी दिल्लीला रवाना होती. दिल्लीतील नियोजित कृषी सन्मान सोहळा आटोपल्यावर एकनाथ शिंदे भाजप नेत्यांनी भेटू शकतात. या भेटीत आगामी विधानपरिषद निवडणूक, राज्यपालनियुक्त 12 आमदारांची नावे निश्चित करणे, विधानपरिषदेच्या सभापती पदाबाबत चर्चा होऊ शकते. याशिवाय, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांमध्ये गुप्तं खलबतं होऊ शकतात, असा अंदाज आहे. 


येत्या शुक्रवारी राज्यात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी 12 जण उभे असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे 9 उमेदवार निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी आज रात्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या आमदारांनाही मार्गदर्शन करणार आहेत. अॅग्रीकल्चर टुडे या संस्थेकडून दिला जाणारा कृषी नेतृत्व पुरस्कार महाराष्ट्र सरकारला जाहीर झाला. आज संध्याकाळी एकनाथ शिंदे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. या कार्यक्रमाला  नितीन गडकरी आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. 


शिंदे गटाच्या आमदारांचा मुक्काम वांद्रे येथील ताज लँडसमध्ये


विधानपरिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी महायुतीमधील तिन्ही राजकीय पक्षांनी खबरदारी घेतली आहे. त्यामुळे महायुतीच्या सर्व आमदारांना 12 जुलैपर्यंत पंचतारांकित हॉटेल्समध्ये ठेवले जाणार आहे. भाजपच्या सगळ्या आमदारांचा मुक्काम ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये असेल. (अजित पवार )राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांना एअरपोर्ट जवळच्या ललित हॉटेलमध्ये असणार आहे. ठाकरे गटाच्या आमदारांचा मुक्काम परळच्या ITC ग्रँड हॉटेलमध्ये असेल. शिंदे गटाच्या आमदारांचा मुक्काम वांद्रयाच्या ताज लँडमध्ये असेल.


महायुतीत प्रत्येकालाच तडजोड करावी लागेल : देवेंद्र फडणवीस


देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या नेत्यांना नुकताच तडजोडीचा सल्ला दिला होता.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपण महायुतीत आहोत. जर तुम्हाला याबाबत काहीही अडचण असेल तर अजित पवार, एकनाथ शिंदे आणि माझ्याशी येऊन बोला. आपल्या सर्वांनाच महायुतीत तडजोड करावी लागेल. विरोधक आपापसांत तडजोड करण्यास तयार आहेत, त्यामुळे आपल्यालाही यासाठी तयार रहावंच लागेल. जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल तर, त्याला उगाचच मुद्दा बनवू नका, असे फडणवीसांनी म्हटले होते.


आणखी वाचा


"जर कोणाला अडचण असेल, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार..."; महायुतीच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं