Devendra Fadnavis On Mahayuti: लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर (Lok Sabha Election Result 2024) लगेचच सर्व पक्षांनी विधानसभेसाठी (Maharashtra Assembly Election 2024) आपली कंबर कसल्याचं पाहायला मिळालं. अशातच राज्याच्या राजकारणात विधानसभेसाठी खलबतं सुरू झाली आहे. उमेदवारांच्या नावांची चाचपणी, जागावाटप यासंदर्भात बैठकांची सत्रही होताना दिसत आहेत. दरम्यान, महायुतीच्या (Mahayuti) मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं अनेक महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. 




राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या नेत्यांना सल्ला दिला आहे. युतीच्या नेत्यांनी एकमेकांविरोधात बोलू नये, असंही त्यांनी म्हटलं आहे. महायुतीत राहिलो तर थोडी तडजोड सर्वांनाच करावी लागेल, असा स्पष्ट संदेश देवेंद्र फडणवीस देण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळालं. तसेच, पुढे बोलताना महायुतीतील नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी एकमेकांविरोधात बोलू नये, सर्वांनी एकमेकांचा आदर राखावा आणि अजिबात गोंधळ निर्माण करू नये, अशी विनंती करू इच्छितो, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. 


महायुतीत प्रत्येकालाच तडजोड करावी लागेल : देवेंद्र फडणवीस


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपण महायुतीत आहोत. जर तुम्हाला याबाबत काहीही अडचण असेल तर अजित पवार, एकनाथ शिंदे आणि माझ्याशी येऊन बोला. आपल्या सर्वांनाच महायुतीत तडजोड करावी लागेल. विरोधक आपापसांत तडजोड करण्यास तयार आहेत, त्यामुळे आपल्यालाही यासाठी तयार रहावंच लागेल. जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल तर, त्याला उगाचच मुद्दा बनवू नका."


यावर्षी महाराष्ट्राय विधानसभा निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील सर्वच पक्षाचे लक्ष विधानसभा निवडणुकीकडे लागलं आहे. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरुन महायुतीतील नेत्यांमध्ये खडाजंगी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच देवेंद्र फडणवीस, अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार असल्याचे सांगितलं होतं. 


तसेच, गेल्या अनेक दिवसांपासून भाजप राष्ट्रवादीला स्वतंत्र निवडणूक लढवायला लावू शकते, या वृत्ताबाबत बोलताना ते म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वानं आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा अविभाज्य भाग असेल, असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये तिन्हा पक्षांमध्ये जागावाटप शांततेत होईल, असंही तटकरेंनी स्पष्ट केलं आहे. 


दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीची कामगिरी फारशी चांगली नव्हती. महायुतीनं राज्यातील 48 पैकी 17 जागा जिंकल्या होत्या. त्याचबरोबर महाविकास आघाडीला 30 जागांवर यश मिळालं, तर एक जागा अपक्ष उमेदवाराच्या खात्यात गेली.