मुंबई: मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यातील वातावरण सध्या तापले आहे. या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यानचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवारी सकाळी सुरु झाली. आजच्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर विधानभवनाच्या आवारात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट झाली. यावेळी दोघांमध्ये झालेल्या संभाषणाचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संभाषणाचा रोख मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या दिशेने होता का, याविषयी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.


नाना पटोले आणि एकनाथ शिंदे हे विधानभवनाच्या आवारात एकमेकांसमोर आले. त्यावेळी नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलायला सुरुवात केली. व्हीडिओतील आवाज अस्पष्ट असला तरी या दोघांच्या संभाषणाचा विषय मराठा आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील असल्याचे प्रथमदर्शनी सूचित होत आहे. नाना पटोले यांनी खेळीमेळीत, 'हे काय चाललंय?', असा सवाल एकनाथ शिंदे यांना विचारला. त्यावर एकनाथ शिंदेंनी तात्काळ म्हटले की, 'मर्यादेच्या बाहेर गेला की कार्यक्रम करतोच.' यावर नाना पटोले यांनी म्हटले की, मला सांगा, तुम्ही त्याला वाढवलं ना? त्यावर शिंदे यांनी, 'तो सामाजिक कार्यकर्ता होता तोपर्यंत ठीक होते', असे म्हणत काढता पाय घेतला. एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याचा रोख मनोज जरांगे यांच्या दिशेने असल्याची चर्चा आता रंगली आहे. त्यामुळे आता मराठा आंदोलक कशाप्रकारे व्यक्त होतात, हे पाहावे लागेल.


एकनाथ शिंदेंचा जरांगे यांना इशारा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी रात्री एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत तिन्ही नेत्यांनी मनोज जरांगे यांनी फडणवीसांबाबत बोलताना वापरलेल्या भाषेचा निषेध केला होता. मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे यांना निर्वाणीचा इशाराच दिला होता. मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर केलेले आरोप निराधार आहेत. त्यांनी सरकारच्या संयमाची परीक्षा पाहू नये. जरांगे यांनी कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करु नये. मनोज जरांगे पाटलांची भाषा राजकीय आहे. त्यांच्या मागे कोणीतरी आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते.