Ketaki Chitale :  आपल्या  वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने पुन्हा एकदा नव्याने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आपल्या नव्या पोस्टमध्ये केतकी चितळेने मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. जय महाराष्ट्र असे म्हणून गप्प बसावे का या सर्कशीत असलेल्या कलाकारांवर हातातील पॉपकॉर्न फेकावे कळत नाही, असे केतकीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले  आहे. 


केतकी चितळे हिने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टला मनोज जरांगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेची किनार असल्याचे म्हटले जात आहे. केतकीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, कालचा दिवस फार इंटरेस्टिंग होता. एके ठिकाणी (बरीच वर्षे शिव्या घातल्यावर) ब्राह्मण तुष्टीकरण करताना स्वतःचा कानांनी ऐकले व डोळ्यांनी बघितले, आणि दुसरीकडे, काही किलोमीटर अंतरावर एका मोर्चा धारक "महापुरुषांनी" एका राजकारणी नेत्यांना ब्राह्मण म्हणून अपशब्द वापरले, अशी बातमी ऐकली! 
जय महाराष्ट्र असे म्हणून गप्प बसावे का या सर्कशीत असलेल्या कलाकारांवर हातातील पॉपकॉर्न फेकावे कळत नाहीये, असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले. 



 केतकी चितळेच्या पोस्टवर युजर्सने कमेंट केल्या आहेत. काहींनी तिच्या पोस्टला सहमती दर्शवली. तर काहींनी केतकीवर टीका केली आहे. एका युजरने, काय मॅडम तुमचे विचार जातीपातीत भांडणे लावणे एवढाच विचार फक्त डोक्यात असतो का असा प्रश्न केला. तर,  पाटील कुस्तीची तयारी करून निघाले,पण सामना बुद्धिबळाचा निघाला अशी कमेंट एका युजरने केली. 


मनोज जरांगे यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका 


मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. फडणवीस यांच्यामुळे मराठा आरक्षणात अडथळे येत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला होता.  त्यानंतर जरांगे यांच्यावर भाजप नेत्यांनीदेखील टीकास्त्र सोडले आहे.


या आधीदेखील मनोज जरांगेंवर टीका 


केतकी चितळे हिने  याआधी देखील मनोज जरांगे यांच्यावर टीका केली होती.  केतकी चितळेने मनोज जरांगे यांच्या वक्तव्याचा एक फोटो शेअर  करत टीका केली. जरांगे यांचे आता कसे, खरे रुप दिसले. मुखवटा फार काळ टिकत नाही. यांना फूट पाडायची आहे सनातनींमध्ये. आता तरी जागे व्हा" अशी पोस्ट तिने केली होती. मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले आहेत,"धनगर आणि मुस्लीम बांधवांनी मागणी केल्यास त्यांच्याही आरक्षणासाठी मी लढा देईल. मग बघतो सरकार कसं आरक्षण देत नाही त्यांना" अशा आशयाचे वक्तव्य केले होते. त्यावर केतकीने जरांगेंवर टीका केली होती.