पुणे : राज्यातील राजकारण अत्यंत खालच्या स्तराला जात असल्याचा आरोप सातत्याने केला जातो. मात्र, राजकीय पक्षांतील नेते, प्रवक्ते ज्या पद्धतीची भाषा वापरुन एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळतात, त्यावरुन वाद होताना दिसून येत आहे. एकीकडे मनसे विरुद्ध अमोल मिटकरी असा वाद रंगला असताना, दुसरीकडे भाजप नेत्या चित्रा वाघ विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षातील महिला नेत्यांमध्ये जुंपल्याचं दिसून येत आहे. चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह काही राजकीय नेत्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते नितीन देशमुख यांची चित्रा वाघ यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आता, आमदार विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 


चित्रा वाघ यांनी सोशल मीडियात शरद पवार आणि काही राजकीय नेते आणि पत्रकार यांच्याविरोधात शेअर केलेल्या एका चित्रावरून राष्ट्रवादीच्या नितीन देशमुख यांची तक्रार केली होती. या चित्रातून शरद पवार यांच्या सोबतच मनोज जरांगे, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्ते यांची चित्रा वाघ यांनी बदनामी केली असून सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आलाय. चित्रा वाघ यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची तक्रारीद्वारे मागणी करण्यात आली. त्यानंतर, आता विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केला. यावेळी, चित्रा वाघ यांनी आमच्या कौटुंबिक वादात उडी घेऊन आम्हाला बदनाम करण्याचं कारस्थान केल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी केला.


सापशिड्यांचा वापर करुन ही मोठी झाली


चित्रा वाघ यांना सापशिडीवर जसं ढांग पडून मोठ्या शिडीवर जायचं असतं,  तसं आपण कोणी खूप मोठं झालोय की काय, असं त्यांना वाटतंय. चित्रा वाघ यांनी सापशिड्यांवर अनेकांचा वापर केलाय, त्यात मीही आहे, असे म्हणत चित्रा वाघ ही आमच्यामुळेच मोठी झालीय, असे चव्हाण यांनी म्हटलं. त्यामध्ये, राष्ट्रवादीचे नेते मुधकर पिचड होते, जयंत पाटील, सुनिल तटकरे यांच्याकडे मी तिची शिफारस केलीय. त्यानंतर, ही मोठी झालीय आणि आज सुप्रिया सुळे व शरद पवारांवर ही टीका करतेय, अशा शब्दात विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केला आहे.  



चित्रा वाघ यांनी शरद पवारांवर केली होती टीका


चित्रा वाघ यांनी शरद पवारांसह राजकीय नेते आणि पत्रकारांबाबत एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टचे कॅप्शन लिहिताना चित्रा वाघ यांनी लिहिले की, "एक छान कार्टून पाहण्यात आले. ज्याने काढले, त्याच्या कल्पकतेला सलाम! महाराष्ट्राचे पक्षीमित्र ! एकाचा वापर संपला की दुसरा पिंजऱ्यातून बाहेर काढतात !"