Ambadas Danve Meet Maratha Aandolak: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री (Matoshree) निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या (Maratha Kranti Thok Morcha) वतीनं देण्यात आला होता. त्यानुसार, मराठा आंदोलकांनी (Maratha Aandolak) मातोश्रीबाहेर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत भूमिका स्पष्ट करा, अशी मागणी आंदोलकांच्या वतीनं करण्यात आली होती. तसेच, त्यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकांशी संवाद साधला. तसेच, आरक्षणावर सरकार जी भूमिका घेईल, त्याला पाठिंबा असेल, असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर मातोश्रीबाहेर आंदोलन करणारे रमेश केरे पाटील भाजपचा माणूस असल्याचा आरोप दानवेंनी केला आहे. 


रमेश केरे म्हणजे, भाजपचा माणूस : अंबादास दानवे 


विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बोलताना सांगितलं की, "असं थोडी, वेळ घेऊन आलं पाहिजे, ते आले आणि उद्धव ठाकरे भेटले, असं थोडीच होतं. नीट आलं पाहिजे. बोलायला, भेटायला काहीच हरकत नाही, पण हा प्रकार चुकीचा आहे. रमेश केरे म्हणजे, भाजपचा माणूस आहे. मंत्रालयाजवळ ते भाजप नेत्यांचे बॅनर लावताना बऱ्याचदा दिसतात. हे सर्व मुद्दाम केलं जात आहे. हे रमेश केरे आहेत, त्यांचं नेहमी विखे पाटलांच्या चेंबरमध्ये दिसतात, ते नेहमी भाजपच्या नेत्यांचे पोस्टर्स लावताना दिसतात. मराठा आरक्षणाबाबत सरकारनं भूमिका घ्यावी, त्या भूमिकेला आम्ही पाठिंबा देऊ, असं आम्ही सांगितलेलं आहे. उद्धव ठाकरे थोडीच सरकारमध्ये आहेत, त्यामुळे ते कसे काय भूमिका घेऊ शकतात? त्यामुळे यांना थोडंसं डोकं असलं पाहिजे, यांनी विधानभवनावर गेलं पाहिजे, सागर बंगल्यावर गेलं पाहिजे."


मराठा आरक्षणाची आमची भूमिका आधीपासूनच स्पष्ट : अंबादास दानवे 


सरकारचे प्रतिनिधी म्हणतात की, मराठा आरक्षण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गेलं, यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, हे लोक काहीही खोटं बोलतात, मग आता द्या आरक्षण... आम्ही वारंवार मराठा आरक्षणाबाबत आमची भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षणाचा ज्यावेळी विधीमंडळात ठराव आला, त्यावेळी एकमतानं आम्ही मंजूर केला आहे. आम्ही आमची भूमिका लपवून ठेवली होती का? नाही, सर्वांसमोर मांडली. तसेच, अंबादास दानवेंनी मातोश्रीबाहेर आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांशी संवाद साधला. त्यावेळी अंबादास दानवेंनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. 


तुम्हाला उद्धव ठाकरेंना भेटायचं असेल, तर त्यासाठी तुम्ही वेळ घेतली पाहिजे, असं अचानक थोडीच करायचं असतं. आमची भूमिका स्पष्ट आहे, तीच तीच भूमिका सारखी सारखी काय विचारायची? तुम्हाला बोलायचंच असेल, तर तुम्ही वेळ घ्या, या... आम्ही बोलू तुमच्याशी. तुम्ही खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटलं पाहिजे, यामध्ये उद्धव ठाकरे काय करणार आहेत? मी उद्धव ठाकरेंशी बोलतो आणि तुमच्यापैकी काही जणांना बोलावून घेतो. आपण शांततेनं बोलून यातून मार्ग काढू. तुम्ही जर कुणााच्या सांगण्यावरुन इथं आला असाल, तर आम्ही भेटणारही नाही, हेसुद्धा सांगतो. आताच मनोज जरांगेंनी सांगितलं की, आमचा आंदोलनाशी काहीच संबंध नाही. आमची भूमिका तुम्हाला माहीत आहे, तुम्ही झोपलेले आहात की, जागे आहात? 


मातोश्रीबाहेर आंदोलनाची घोषणा करणाऱ्यांना नोटीस


मातोश्रीबाहेर आंदोलन करण्याची घोषणा करणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांकडून नोटीस धाडण्यात आली आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील यांना खेरवाडी पोलीस ठाण्याकडून नोटीस धाडण्यात आली आहे. तसेच, अंबादास दानवेंनी आंदोलनकर्त्यांशी बोलल्यानंतर रमेश केरे पाटील यांनी आमचं आंदोलन सर्वपक्षीय नेत्यांच्या घरासमोर होणार आहे, असं स्पष्ट केलं. 


मोतोश्रीबाहेरचं आंदोलन दरेकरांच अभियान : मनोज जरांगे 


मनोज जरांगे पाटील यांनी मातोश्रीबाहेरील मराठा आंदोलकांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे म्हणाले की, "मुंबईतील आंदोलन दरेकरांच अभियान आहे. मराठा समाज सर्व पक्षाला जाब विचारण्यासाठी सक्षम आहे. सध्या मराठा समाजातं महाराष्ट्रात कोणतंही आंदोलन सुरू नाही. हे आंदोलन दरेकरांच्या अभियानाचा भाग असू शकतं, आता खाली धरलेल्या या आंदोलन पोरांना समाजाच्या नजरेतून पाडू नका."