रत्नागिरी : राज्यातील अनेक ठिकाणी मतदान केंद्रावरील गोंधळाच्या बातम्या येत असताना आता चिपळूणमधून मोठी बातमी समोर आली आहे. चिपळूणमधील मतदान केंद्रातील लाईट गेल्याने एकच गोंधळ उडाला. त्यानंतर प्रशासनाने धावपळ सुरू केली असून पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अद्याप 400 मतदार हे बाहेर ताटकळत असून त्यांचे मतदान पूर्ण होण्यासाठी रात्री 9 वाजतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
चिपळूणमधील खेड परिसरात मतदान केंद्रात लाईट नसल्याने गोंधळ उडाला आहे. अंधारात मतदान करावे लागत असल्याने अद्यापही चारशेहून अधिक मतदार केंद्राच्या बाहेर मतदानाच्या प्रतीक्षेत आहेत. मतदार आक्रमक झाल्यानंतर प्रशांसन कामाला लागलं असून विजेची व्यवस्था करण्यासाठी व्यवस्थेची धावपळ सुरू आहे.
अतिरिक्त पोलिस तैनात
रांगेतील मतदान संपण्यास रात्रीचे 9 वाजतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मतदार आक्रमक झाल्यानंतर मतदान केंद्राबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदान केंद्रात अंधार असल्याने प्रक्रियेला अर्धा तासाहून अधिकचा वेळ जात असल्याने रांगेतील मतदार ताटकळले आहेत. आक्रमक मतदारांनी गोंधळ घालण्यास सुरवात केल्यामुळे मतदान केंद्रात पोलिसांचा अधिकचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच अनावश्यक गर्दी हटवत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
राज्यातील 11 जागांमधील लक्षवेधी लढतींपैकी एक म्हणजे रत्नागिरी-सिंधुदुर्ग. इथे भाजपचे नारायण राणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत असा सामना आहे. मतदानाच्या दिवशी सकाळी कणकवलीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मतदानाचा हक्क बजावला. नारायण राणे पहिल्यांदाच लोकसभा लढत आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला. राऊत यांच्या कन्या रुची राऊत या फर्स्ट टाईम व्होटर होत्या, त्यांनी पहिल्यांदाच मतदान केलं.
शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत तर फायर ब्रँड नेते रामदास कदम यांनी खेडमध्ये मतदान केलं. रिचेबल-नॉट रिचेबलचा खेळ दिवसभर सुरु राहिला तो किरण सामंत यांच्यामुळे. अखेर मतदानाला 15 मिनिटे बाकी असताना पाली या मूळ गावी मतदानासाठी आले आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. सीम कार्डच्या प्रॉब्लेममुळे आपण नॉट रीचेबल होतो असं त्यांनी सांगितलं.
मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत तर उबाठा शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सहकुटूंब कणकवलीत मतदानाचा अधिकार बजावला. त्यांची मुलगीही आज फर्स्ट टाईम व्होटर होती. उबाठा शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी त्यांच्या चिपळूण मधील तुरुंबव येथील मूळ गावी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. शिवसेनेचे पक्षप्रतोद आमदार भरत गोगावले यांनी त्यांच्या महाड येथील खरवली मतदान केंद्रावर सपत्निक मतदानाचा हक्क बजावला.
ही बातमी वाचाl: