Nagpur News : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना मॉलमध्ये मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर पोलिसांनी जी कारवाई केली, ती कायदेशीर आहे. त्यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले. त्यांचे आज दुपारी नागपूर विमानतळावर आगमन झाले होते. येथून ते भंडारा (Bhandara) येथे विविध कार्यक्रमांसाठी रवाना झाले. त्यापूर्वी विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला.


यावेळी संजय राऊत यांच्याबद्दल विचारले असता 'संजय राऊत मोठे नेते आहेत...', येवढेच बोलून त्यांनी बोलणे टाळले. भंडाऱ्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच गोसीखुर्द प्रकल्पाची पाहणी आणि जल पर्यटनाच्या लोकार्पण कार्यक्रमानिमित्त ते भंडारा दौऱ्यावर आहेत. सरकार शासनाच्या कामांना गती आणि चालना देण्याचं काम करत आहे, त्याचाच एक भाग म्हणून भंडाऱ्यातील लोकाभिमुख विकासाची काम सुरू करतोय, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांनी काल शिंदे गटात प्रवेश घेतला. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, काल गजानन कीर्तीकर आमच्याकडे आलेत. एक वरिष्ठ नेते खासदार आमच्याकडे आले, त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला होईल, त्यांचं मार्गदर्शन, त्यांच्या कामाच्या अनुभवाचा फायदा आम्हाला आणि महाराष्ट्राला होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.  


प्रकल्प म्हणजे जादूची कांडी नाही


मुख्यमंत्री म्हणाले, आमचं सरकार हे विकास कामांना प्राधान्य देते. अडीच वर्षात जी कामं प्रलंबित होती त्यांना चालना देण्याचे काम गेल्या तीन चार महिन्यांत करतोय. विकासाभिमुख हे सरकार आहे. या राज्याचा सर्वांगीण विकास करणे, यावर आमचा फोकस आहे आणि जे प्रकल्प थांबले आहेत. त्यांना पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय. कुठलाही प्रकल्प असा तीन-चार महिन्यात येतो आणि जातो, असं होत नाही, जादूची कांडी नाही की इकडून आला आणि तिकडे गेला. आरोप करायचं तर कोणीही करू शकतो, मात्र आमचं जे सरकार आहे, ते उद्योगांना चालना देणार आहे.


भविष्यात राज्यात मोठे प्रकल्प येणार


नजीकच्या काळात आपल्याला दिसेल आणि गेल्या चार महिन्यात काय केलं आणि अडीच वर्षात त्यांनी काय केलं हेही दिसेल आणि भविष्यामध्ये जे मोठे प्रकल्प महाराष्ट्रात येणार आहेत तेसुद्धा आपल्याला दिसतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारला आश्वस्त केलं आहे की या राज्यात मोठे उद्योग आणि रोजगार निर्मिती करू. मी प्रधानमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो की दोन हजार कोटी रुपये आम्हाला दिले. त्यामुळे विकासाभिमुख सरकार आहे. आम्ही राज्याचा सर्वांगीण विकास करणार आहोत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


हेही वाचा


Shah Rukh Khan : कस्टम ड्युटी न भरल्यानं किंग खानला मुंबई विमानतळावर रोखलं; तासभर चौकशी, लाखोंचा भुर्दंड