Wardha News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने महिलांच्या बाबतीत केलेल्या घाणेरड्या वक्तव्यामुळे पोलिसांनी राजन पाटील (Rajan Patil) यांच्यावर तात्काळ 354 चा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केली. वर्ध्यात एबीपी माझाशी बोलताना त्यांनी राजन पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. 'पाटलांच्या पोरांना लग्नाच्या आधीच तुझ्याएवढी बाळं असतात आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे, असं राजन पाटील म्हणाले होते.
आठ दिवसांपूर्वी महिला सन्मानाची भूमिका असणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाची त्याच पक्षाच्या नेत्याने आता जी काही माती केली आहे त्याबद्दल त्यांनी सांगावं. राजन पाटील यांचं वक्तव्य अतिशय संतापजनक आणि निषेधार्ह आहे. ज्या पद्धतीने त्यांनी दर्पोक्ती केली आहे, ही भूमिता त्यांची आहे? त्यांच्या पक्षाची आहे, ही भूमिका नक्की कोणाची आहे हे मांडणं अतिशय गरजेचं आहे. हा वाद काही जुना नाही, महिलांच्या सन्मानाच्या गोष्टी करण्यात आल्या आणि राष्ट्रवादीच्या या नेत्याने तर महाराष्ट्रातील सर्व महिलांची खिल्ली उडवण्याचं काम केलं आहे. त्याचा निषेध करावा तितका कमी आहे," असं चित्रा वाघ म्हणाल्या.
आता राजन पाटलांच्या फोटोवर चपला हाणून आंदोलन करणार का? : चित्रा वाघ
आता मला बघायचं आहे की महाराष्ट्रातल्या रणरागिणी ज्यांचा महिला सन्मानाबाबत गेल्या आठ दिवसांपासून गदारोळ चालला होता आता त्यांच्या पक्षाच्या नेत्याने अशाप्रकारचं वक्तव्य केलं आहे तर त्यांची भूमिका काय आहे. आता त्यांना तुम्ही महाराष्ट्रात फिरु देणार नाही का? आता आंदोलनं करणार आहात का? फोटोवर चपला हाणून आंदोलन करणार आहात का? असे प्रश्नही चित्रा वाघ यांनी विचारले.
राजन पाटील यांच्या वक्तव्याने महाराष्ट्रातील महिलांचा विनयभंग
राज्यातील प्रत्येक महिलेचा सन्मान आमच्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे. नेत्यांनी अशाप्रकारची मुक्ताफळे उधळली असतील तर त्याच्यावर त्यांचा पक्ष काय कारवाई करतो हे बघणं गरजेचं आहे. विशेषत: माझं सोलापूर पोलिसांना सांगणं आहे की राजन पाटील यांच्या वक्तव्याने महाराष्ट्रातील तमाम महिलांचा विनयभंग झाला आहे त्याच्यावर 354 चा गुन्हा तात्काळ दाखल करा..
राजन पाटील काय म्हणाले होते?
भीमा कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या प्रचारसभेत धनंजय महाडिक यांच्यावर टीका करताना राजन पाटील यांची जीभ घसरली होती. 'आमच्या पोरांना बाळ म्हणतोय, अरे आम्ही पाटील आहोत, पाटलांच्या पोरांना लग्नाच्या आधीच तुझ्याएवढी एवढी बाळं असतात असे सांगत त्याचा आम्हाला स्वाभिमान असल्याचे राजन पाटील म्हणाले होते. तसेच आमच्या पोरांना वयाच्या 17 व्या वर्षीच 302, 307 ची कलमं लागली आहेत, याचा आम्हाला अभिमान असल्याचे म्हणत राजन पाटील यांनी एकप्रकारे मुलांच्या गुन्हेगारीचं समर्थन केलं आहे.
VIDEO : Chitra Wagh on Rajan Patil:महिला सन्मानाची भाषा, आता राष्ट्रवादीने राजन पाटील यांच्याबाबत बोलावं
संबंधित बातमी