Maharashtra Politics : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ट्रॅपमध्ये अडकले असून उद्या शरद पवारांनी सांगितलं तर उद्धव ठाकरे काँग्रेसच्या व्यासपीठावरही जाऊन बसतील. इतकी वर्षे उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत राहून, प्रचार करुन विधानसभा, लोकसभा निवडणूक लढवली. मात्र शरद पवार यांच्या सांगण्यावरुन विचारांशी कॉम्प्रोमाईज करुन ते राष्ट्रवादी सोबत गेले, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते आज (12 नोव्हेंबर) कोल्हापुरात (Kolhapur) पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर चंद्रकांत बावनकुळे हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. कोल्हापूर हा त्यांच्या दौऱ्यातील 25 वा जिल्हा आहे. संघटना मजबूत करण्यासाठी ते कार्यकर्त्यांशी संवाद आणि समन्वय साधत आहेत.


उद्धव ठाकरे अजूनही शरद पवारांच्या त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकेले आहेत
शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केल्याचं बावनकुळे यांनी साताऱ्यात म्हटलं होतं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून मोठ्या प्रमाणात बावनकुळे यांच्यावर टीका झाली होती. याबाबत विचारले असता ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची बुद्धी भ्रष्ट करण्याचे काम शरद पवार यांनी केलं असून  मी कोणालाही वाईट भाषेत बोललो नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार मी बोललो. मात्र उद्धव ठाकरे अजूनही त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकले आहेत. उद्या शरद पवारांनी सांगितलं तर उद्धव ठाकरे काँग्रेसच्या व्यासपीठावर जाऊन बसतील. इतके वर्ष उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत राहून विधानसभा, लोकसभा निवडणुकीचा प्रचार केला. मात्र निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांचं ऐकत विचारांशी कॉम्प्रोमाईज करुन जीवनातील मोठी चूक केली असून राज्यातील काही पक्ष सत्येशिवाय राहू शकत नाहीत. बाळासाहेबांचे विचार बाहेर पडले तरी उद्धवजींना फरक पडत नाही. त्यांना फक्त काँग्रेस-राष्ट्रवादी पाहिजे, असं बावनकुळे म्हणाले आहेत.
 
नेत्यांच्या पोरांनी राहुल गांधींची भारत जोडो यात्रा हायजॅक केली
बावनकुळे हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. माझ्या या दौऱ्यादरम्यान मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश देखील होत आहेत. साताऱ्यात बाराशे काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. एका बाजूला राहुल गांधी यांची यात्रा महाराष्ट्रात आणि कार्यकर्ते भाजपमध्ये अशी परिस्थिती सध्या काँग्रेसमध्ये आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेत काँग्रेस कार्यकर्ते कमी आणि आणि नेत्यांच्या पुढच्या पिढीचं लॉन्चिंग होत आहे. त्यामुळे राहुल गांधींची यात्रा नेत्यांनी आणि त्यांच्या मुलांनी हायजॅक केली आहे. सामान्य कार्यकर्त्यांना यात्रेचा गंधही नाही अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्या काँग्रेस जोडो यात्रेवर केली. तसंच मागील अडीच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी सरकार हायजॅक केले होते म्हणत 2024 पर्यंत भाजप आणि शिंदे गटाकडे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार असून महाविकास आघाडीमध्ये मोठ मोठे बॉम्बस्फोट होणार आहेत. 2024 मध्ये विरोधी पक्षांना उमेदवार देखील मिळणार नाही अशी अवस्था होईल, असंही  बावनकुळे म्हणाले.


संबंधित बातमी


Maharashtra Politics: राष्ट्र्वादी काँग्रेसने जादूटोणा करून उद्धव ठाकरेंना आपल्या जाळ्यात ओढलं; बावनकुळे यांच वक्तव्य