बंडखोरी, मतभेदाच्या राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य पणाला; कोण होणार गुलालाचा मानकरी?
842 मतदान केंद्रांमधील मतमोजणीसाठी 70 टेबल मांडण्यात आले असून पहिला मतमोजणीच्या 13 फेऱ्या नियोजित आहेत.

Chhatrapati Sambhajinagar Graduate Constituency Election Result: महाराष्ट्र विधान परिषदेच्या 2026 मधील पाच पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात सतीश चव्हाण, दिलीप घुगे आणि प्रतापसिंह पाटील यांच्यात चुरशीचा सामना रंगणार आहे. 27 ऑक्टोबरला सकाळी आठ वाजल्यापासून छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा उद्योगिक क्षेत्रात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 842 मतदान केंद्रांमधील मतमोजणीसाठी 70 टेबल मांडण्यात आल्या असून पहिला मतमोजणीच्या 13 फेऱ्या नियोजित आहेत. या निवडणुकीत 41 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
41 उमेदवारांपैकी कोणाला मतदारांचा पाठिंबा मिळणार?
या निवडणुकीच्या लढतीत पदवीधर मतदारसंघात क्रमवारी आणि मत हस्तांतरणाच्या आधारावर मतमोजणीच्या प्रक्रियेमुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास काही वेळ लागू शकतो. त्यामुळे उमेदवार त्यांच्या समर्थक आणि संपूर्ण मतदारसंघातील राजकीय वर्तुळाचे लक्ष या मतमोजणीवर लागले आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील 842 मतदान केंद्रांवर 23 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले. प्राथमिक आकडेवारीनुसार एकूण 1 लाख 91 हजार 689 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 58.67% एवढी मतदानाची टक्केवारी होती. आता मतमोजणीतून 41 उमेदवारांपैकी कोणाला मतदारांचा पाठिंबा मिळणार हे स्पष्ट होणार आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये तिहेरी लढत
दरम्यान मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी तिहेरी लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि माजी आमदार सतीश चव्हाण हे महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दिलीप घुगे पदवीधर निवडणुकीच्या मैदानात असून शरद पवार गटाचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यात हा सामना रंगणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या आधी बंडखोर आमदारांचे अर्ज, महायुतीत उमेदवारीवरून झालेले मतभेद, शिंदसेनेनं काढून घेतलेला पाठिंबा तसेच शिंदे सेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवाराला दिलेल्या पाठिंबावरून मोठी चर्चा रंगली होती. आता मतदारांचा पाठिंबा नेमका कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.






















