Nashik Loksabha : नाशिक लोकसभा मतदार संघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. छगन भुजबळ यांच्या समर्थकांकडून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला जातोय. नाशिकच्या जागेवरून महायुतीत तिढा कायम असताना भुजबळांचा टिझर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहेत. शिवाय त्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा असल्याचे छगन भुजबळ यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते.
नाशिकची जागा कोणाकडे जाणार ?
महायुतीत जवळपास 46 जागांचा तिढा सुटला आहे. मात्र, नाशिक आणि ठाण्याच्या जागेवरुन महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिकच्या जागेवरुन मला पुन्हा एकदा उमेदवारी मिळावी, अशी मागणी करत मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानासमोर जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे नाशिकच्या जागेसाठी आग्रह धरणार असं स्पष्ट केलं. शिवाय राष्ट्रवादीचे अनेक नेतेही नाशिकच्या जागेवरुन आग्रही आहेत.
नाशिकमध्ये भाजपचे 3 तर राष्ट्रवादीचे 2 आमदार
नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद सर्वांत जास्त आहे. त्यामुळेच भाजप नाशिकच्या जागेसाठी आग्रह आहे. त्यामुळेच महायुतीमध्ये भाजपने या जागेसाठी जोर लावलाय. दुसरीकडे राष्ट्रवादीचेही या मतदारसंघात 2 आमदार आहेत. त्यामुळे छगन भुजबळ यांच्याकडून या जागेवर सातत्याने दावा केला जातोय. आता तर त्यांच्या समर्थकांनी एक व्हिडीओ देखील व्हायरल केला आहे. दरम्यान, महायुतीतील कोणता नाशिकची जागा खेचून आणतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
महायुतीकडून 48 जागांपैकी 46 जागांवार निर्णय
महायुतीने 48 जागांपैकी 46 जागांवर जवळपास अंतिम निर्णय घेतला आहे. यातील 13 जागा शिंदे गटाला, 4 जागा अजित पवार यांच्या गटाला मिळणार आहेत. शिवाय, अजित पवारांच्या 4 पैकी परभणीची जागा महादेव जानकर यांना देण्यात येईल. दरम्यान, नाशिक आणि ठाणे या दोन जागांवर तिन्ही पक्षात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. जागावाटपात केवळ 4 जागा मिळाल्याने अजित पवारांची राष्ट्रवादी नाशिकच्या जागेसाठी आग्रही असू शकते.
इतर महत्वाच्या बातम्या