Nashik Lok Sabha Constituency : काल (दि. 24) नाशिकचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी शेकडो कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निवासस्थानी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. नाशिकची जागा शिवसेनेचीच, अशी मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. यानंतर नाशिक भाजपचे पदाधिकारी आक्रमक होत थेट मुंबईला पोहोचले. नाशिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. नाशिकची जागा भाजपलाच मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर नाशिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, नाशिकमध्ये भाजपचे तीन आमदार आहेत. तसेच एकूण 100 नगरसेवक नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाचे आहे. त्यामुळे नाशिकची जागा भाजपला मिळावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत. नाशिकच्या जागेबाबत आमचे एकमत आहे. त्यासाठी आम्ही आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
नाशिकला भाजपची ताकद अधिक
मनसे महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे. मनसेकडून नाशिक आणि शिर्डीच्या जागेवर दावा करण्यात आला आहे. यावर देवयानी फरांदे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, मेरीटचा विचार करता वरिष्ठांनी याबाबत विचार करावा, अशी आमची मागणी आहे. जर त्यांची ताकद तिथे अधिक असेल तर त्यांना उमेदवारी द्यावी, मात्र आज फिल्डवरचा विचार केला, भाजपच्या ताकदीचा विचार केला तर भाजप नक्कीच श्रेष्ठ ठरत आहे. देवेंद्र फडणवीस देखील नाशिकच्या जागेसाठी आग्रही आहेत का? असा सवाल विचारला असता देवयानी फरांदे म्हणाल्या की, आम्ही सर्वांनी आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. आमची याबाबत सखोल चर्चा झाली आहे. त्यांना देखील हे माहीत आहे की, नाशिकला भाजपची ताकद अधिक आहे, असे त्या म्हणाल्या.
नाशिकची जागा नेमकी कुणाला?
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीदेखील नाशिकच्या जागेवर दावा केला आहे. याबाबत देवयानी फरांदे म्हणाल्या की, जागा सर्वच मागतील. मात्र ज्यांची जास्त ताकद आहे. ज्यांचे लोकप्रतिनिधी आहे. त्यांना ही जागा मिळावी, असा आमचा आग्रह आहे. म्हणून आम्ही मुंबईला देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आलो. दरम्यान, बैठकीला आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, आमदार राहुल आहेर, दिनकर पाटील, केदा आहेर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आता नाशिकची जागा नेमकी कुणाला मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
Hemant Godse : नाशिक लोकसभेवरून रस्सीखेच, हेमंत गोडसेंनी थेट घोषणाच करून टाकली!