Maharashtra Cabinet Expansion मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या लँडस्लाईड यशानंतर महायुतीचे स्पष्ट बहुमताचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर, नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तारही पार पडला. राज्य सरकारच्या 39 मंत्र्‍यांचा शपथविधी झाला, त्यामध्ये भाजपच्या 19, शिवसेना शिंदेंच्या 11 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 9 आमदारांना मंत्रि‍पदाची संधी मिळाली. त्यामुळे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्‍यासह 42 मंत्र्‍यांचा शपथविधी संपन्न झाला असून अद्यापही 1 जागा शिल्लक आहे. 


छगन भुजबळ समर्थक आक्रमक, अजित पवारांच्या प्रतिमेला मारले जोडे 


मात्र, असे असताना शपथविधीमध्ये मोठ्या प्रमाणात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याने जुने व वरिष्ठ नेते नाराज झाले आहेत. त्यात, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बड्या नेत्यांना मंत्रि‍पदाची संधी न दिल्याने आता उघडपणे नाराजी व्यक्त होत आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी ही नाराजी बोलून देखील दाखवली. परिणामी त्याचे पडसाद आता ठिकठिकाणी उमटायला सुरुवात झाली असल्याचे बघायला मिळाले आहे. मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांना डावल्याचा निषेध व्यक्त करत जालन्यात भुजबळ समर्थक आणि ओबीसी आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यांनी शहरातील गांधी चमन येथे जोडे मारो आंदोलन केलंय. यावेळी या आंदोलकांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. दरम्यान मंत्रिमंडळात समावेश न केल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा ही यावेळी आंदोलकांनी दिलाय. 


दोन दिवसांनी भुजबळ समर्थक मेळावा घेण्याची शक्यता


दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ बैजापूरमार्गे नाशिकच्या दिशेने निघाले असल्याची माहिती पुढे आली आहे. मंत्रिमंडळात स्थान नसल्याने छगन भुजबळ नाराज झाले असून हिवाळी अधिवेशन सोडून भुजबळ नाशिकच्या दिशेने रवाना झाले आहे. दरम्यान, उद्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची छगन भुजबळ भेट घेणार असून पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेणार आहेत. तर दोन दिवसांनी भुजबळ समर्थक मेळावा घेण्याची शक्यता आहे. 


छगन भुजबळांकडून नाराजी उघड 


छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांनी स्पष्ट शब्दात नाराजी उघड केली आहे. जरांगेंना अंगावर घेतल्याचं बक्षीस मला मिळालंय, असे म्हणत छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात संधी न दिल्याबद्दल आपली भूमिका मांडली. दरम्यान, छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठविण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


हेही वाचा


मोठी बातमी ! रविंद्र चव्हाण अन् सुधीर मुनगंटीवारांचा पत्ता कट; फडणवीस सरकारमध्ये स्थान नाही