Chhagan Bhujbal : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) रविवारी झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. यामुळे छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले असून ते नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सोडत सोमवारी तडकाफडकी नाशिकला रवाना झाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बहुतांश आमदारांचं छगन भुजबळ यांना मंत्रिपद द्यायला हव होतं, असं मत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाची बाजू लावून धरली, विधानसभेला भुजबळांमुळेच ओबीसी समाज एक व्हायला मदत झाली. त्यामुळे भुजबळांना मंत्री करणं गरजेचं होतं, असं आमदारांचं मत असल्याचे समजते. आता भुजबळांवर अन्याय झाला तर आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत फटका बसू शकतो, अशी भीती देखील आमदारांमध्ये असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भुजबळांची मनधरणी करण्यात यशस्वी होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
छगन भुजबळ काय निर्णय घेणार?
दरम्यान, छगन भुजबळ यांनी मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. छगन भुजबळ आज नाशिकच्या भुजबळ फार्म आणि येवला मतदार संघातील कार्यालयात कार्यकर्त्यांशी भेटून संवाद साधणार आहेत. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने भुजबळ समर्थक आणि ओबीसी संघटना रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. त्यातच छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना "जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना", असे सूचक वक्तव्य केले होते. त्यामुळे छगन भुजबळ आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीतच राहणार की वेगळा काही निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या