नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही, म्हणजे मंत्रपदाची खुर्ची मिळाली नाही. भुजबळांसह त्यांच्या समर्थकांसाठी हा जबर धक्का होता. भुजबळांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्याकडेही पाठ फिरवली आणि हिवाळी अधिवेशन सोडून नाशिकचा रस्ता धरला. ओबीसींचा आवाज मानला जाणाऱ्या भुजबळांवर ही वेळ का आली? असे प्रसंग अनेकदा अनुभवलेल्या भुजबळांसाठी इथून पुढची वाट कशी असेल? समता परिषदेच्या माध्यमातून आपलं काम सुरुच ठेवतील का? असे प्रश्न आता विचारले जात आहेत.
भुजबळांना मंत्रिपद नाकारल्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. कुठे टायरची जाळपोळ, कुठे रास्तारोको तर कुठे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोरच आंदोलन असं चित्र नाशिक आणि येवला तालुक्यात दिसत होतं.
मंत्रिमंडळात स्थान का मिळालं नाही?
छगन भुजबळ म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झालेले शिवसैनिक. बाळासाहेब असताना शरद पवारांमुळे जोखीम घेत शिवसेना फोडून काँग्रेसमध्ये गेलेले नेते. छगन भुजबळ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापनेपासून शरद पवारांसोबत राहणारे ज्येष्ठ नेते. राष्ट्रवादीत फूट पडल्यावर शरद पवारांना सोडून अजितदादांसोबत राहणारा जुना चेहरा म्हणजे छगन भुजबळ. छगन भुजबळ म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील ओबीसी समाजाचा आताच्या घडीचा सर्वात मोठा चेहरा. असं सगळं असताना मंत्रिमंडळात स्थान का मिळालं नाही हा प्रश्न भुजबळांनाही सतावतोय.
मराठा आरक्षणाचा आगडोंब उसळला असताना मनोज जरांगेंना थेट अंगावर घेणारे हेच भुजबळ होते. एवढं करूनही मंत्रिमंडळातून डावल्याची सल भुजबळांच्या मनात आहे. भुजबळांचे महाविकास आघाडीतील जुने सहकारी आणि आता विरोधी पक्षात असलेले नेते या असंतोषाचा भडका कसा उडेल यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
भुजबळांविरोधात अनेक गोष्टी होत्या. लोकसभा लढण्यासाठी नाशिकमधून दावेदारी करणे, त्यातून शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या मनात तयार झालेला संशय. तसंच विधानसभा निवडणुकीत नांदगांवमधून शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात पुतण्या समीर भुजबळ यांना बळ देत युतीत मिठाचा खडा टाकणे. या त्यातल्या दोन दोन गोष्टी असू शकतात.
अजित पवार कशी समजूत काढणार?
आजवर जेव्हा जेव्हा भुजबळ अडचणीत आलेत किंवा मोठी लढाई लढण्याची त्यांनी तयारी केली तेव्हा तेव्हा समता परिषद आणि भुजबळ समर्थक मैदानात उतरले आहेत. आताही ते समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी आणि येवल्यातील जनतेशी संवाद साधून पुढील निर्णय घेतील असं सांगितलं जातंय. आणखी एका बंडाच्या तयारीत असणाऱ्या छगन भुजबळ यांची समजूत अजित पवार कशी काढणार हे पाहावं लागणार आहे.
ही बातमी वाचा: