नागपूर : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल पार पडला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं 9 जणांना संधी दिली. यामध्ये दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांना संधी देण्यात आली नाही. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यसभेच्या ऑफरवर देखील छगन भुजबळ यांनी नागपूरहून नाशिकला जाताना भाष्य केलं. राज्यसभेची ऑफर नाकारत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.


सात आठ दिवसांपूर्वी तुम्ही राज्यसभेवर जा असं सांगितलं. मात्र, मला काही दिवसांपूर्वी राज्यसभेवर जायचं होतं. सातारला जी जागा दिली तेव्हा राज्यसभेवर जायचं होतं. तेव्हा ती जागा दिली नव्हती. मला त्यावेळी सांगितलं की तुम्हाला येवल्यातून लढलं पाहिजे,असं सांगितलं. तुम्ही लढाईत असला तर पार्टी जोमानं पुढं जाईल असं सांगितलं गेलं. माझ्या लासलगाव येवला मतदारसंघातील मतदारांच्या आशीर्वादनं निवडून देखील आलो, असं छगन भुजबळ म्हणाले. राज्यसभेवर ताबडतोब जाऊ शकत नाही. माझ्या मतदारसंघाच्या मतदारांबरोबर ती प्रतारणा ठरेल. येवल्याच्या मतदारांचा विश्वासघात ठरेल. राज्यसभेवर जायचं तर विधानसभेचा ताबडतोब राजीनामा द्यावा लागेल. ते माझ्या लोकांना दु:खदायक आहे. येवल्याच्या मतदारांशी प्रतारणा करु शकत नाही. मला ज्यांनी जे प्रेम दिलं त्यांच्याशी प्रतारणा करणार नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.  


ओबीसींच्या संरक्षणासाठी मैदानात आलो होतो, घर दारं जाळायला सुरुवात झाल्यानंतर  मागासवर्गीयांच्या संरक्षणासाठी उभा राहिलो. त्यावेळी अगोदर राजीनामा दिला होता. मी आता लढणार आहे, असं सांगितलं. जे चुकीचे आहेत त्यांच्यासोबत लढणार आहे. सभागृहात दोन्ही बाजूचे लोक माझ्या अंगावर येत असताना कायद्याची बाजू घेत, निकालांचा दाखला देत बाजू मांडली. महायुतीला ओबीसी आणि लाडक्या बहिणींचा फायदा झाला, असं छगन भुजबळ म्हणाले. 


राज्यसभेबाबतचा प्रस्ताव आठ दिवसांपूर्वी नाकारला, त्यांना सांगितलं की आता माझा विधानसभा आमदार पदाचा राजीनामा देऊ शकत नाही. ती मतदारांशी प्रतारणा ठरेल. विश्वासघात ठरेल. दोन वर्षानंतर विचार करु, असं त्यांना सांगितल्याचं छगन भुजबळ म्हणाले. येवल्याचे मतदार भेटायला येतील, त्यांना भेटणार असल्याचं छगन भुजबळ म्हणाले. 


छगन भुजबळ यांनी विधानभवन परिसरात देखील नाराजी व्यक्त केली. नव्यांना संधी दिली जातेय, त्यासाठी ज्येष्ठांना डावललं जात असल्याचं ते म्हणाले. सामान्य कार्यकर्ता असून डावललं काय फेकलं काय असं ही ते म्हणाले. मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं, छगन भुजबळ काही संपलेला नाही असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. बॅनरवर फोटो नसल्याचं विचारलं असता कधी कधी बॅनरवर जागा नसते, असं छगन भुजबळ म्हणाले.



इतर बातम्या : 


Chhagan Bhujbal: अजित पवारांशी बोलायची गरज नाही; छगन भुजबळ संतप्त, अधिवेशन सोडून नाशिककडे रवाना