Amit Shah & Chhagan Bhujbal : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज नाशिक दौऱ्यावर आहेत. मालेगाव येथील माजी सैनिक व शेतकऱ्यांनी अजंग येथे उभारलेल्या 538 एकरातील व्यंकटेश्वरा कृषी फार्मला त्यांनी भेट दिली. या कार्यक्रमाच्या मंचावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) देखील उपस्थित होते. अमित शाह यांनी छगन भुजबळांना पाहताच त्यांनी भुजबळांना आपल्या शेजारील खुर्चीत बसायला सांगितले. दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा देखील रंगल्याचे दिसून आले. अमित शाह यांच्यासोबत नेमकी काय चर्चा झाली? याबाबत छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, अमित शाह साहेबांचा मोठेपणा आहे की त्यांनी मी लांब बसलेलं असताना मला आपल्या जवळ बोलावून खुर्चीवर बसवलं. तीन वर्षांपूर्वी येथील लोक माझ्याकडे आले, त्यावेळेस मला विश्वास नव्हता की, असे होऊ शकते. असे मी त्यांना सांगितले. त्यावेळी अमित शाह यांनी म्हटले की, या लोकांनी खरोखर किमया करून दाखवली आहे. याबाबत आमची चर्चा झाली. आमची राजकारणावर कुठलीही चर्चा झाली नाही.
तुम्ही, आम्ही दिल्लीत कधीही जाऊ शकतो
ते मला म्हणत होते की, तुम्ही भाषण करा मग मी त्यांना सांगितलं की, तुम्ही येण्याच्या अगोदरच मी भाषण केलं आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले. अमित शाह यांनी तुम्हाला दिल्लीत भेटायला बोलावले आहे का? असे विचारले असता दिल्ली ही देशाची राजधानी आहे. तुम्ही, आम्ही दिल्लीत कधीही जाऊ शकतो, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. छगन भुजबळांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
मालेगावमधील 'त्या' बॅनर्सची जोरदार चर्चा
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि छगन भुजबळ यांच्या स्वागताचे मालेगावमध्ये बॅनर्स लावण्यात आले आहेत. भुजबळ समर्थक आणि समीर भुजबळ युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून हे बॅनर्स लावण्यात आले असून यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि पक्ष चिन्ह दिसत नाही. बॅनर्सवर केवळ अमित शाह, समीर भुजबळ आणि छगन भुजबळ यांचेच फोटो असल्याने चर्चांना उधाण आले आहे. या बॅनर्सची सध्या नाशिक जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या