पुणे - मुंबईमध्ये काल (गुरूवारी, ता-23) स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने झालेल्या शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाच्या मेळाव्याला राज्यातील विधानसभेचे व संसदेचे काही सदस्य अनुपस्थित राहिले. त्यामुळे राज्यात ठाकरेंच्या सेनेत फूट होणार अशा चर्चा सुरू झाल्या. आमदारांच्या अनुपस्थितीवर वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात आहेत. खरंच राज्यातील शिवसेना पुन्हा फुटणार आहे का? या मेळाव्याला अनुपस्थित राहिलेले खेड आळंदी विधानसभेचे सदस्य बाबाजी काळे यांनी पक्षावर निष्ठा असून ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेशी एकनिष्ठ आहे. तालुक्यातील वाहतूक कोंडीच्या बैठकीमुळे मेळाव्याला उपस्थीत राहू शकलो नाही असं स्पष्टीकरण आमदार काळे यांनी दिलं आहे. 


नेमकं काय म्हणालेत बाबाजी काळे?


मेळाव्याच्या अनुपस्थितीबाबत बोलताना बाबाजी काळे म्हणाले, मी पक्षाशी एकनिष्ठ आहे. पक्षातून बाहेर पडणे असा काही विषय नाही. परवा मी चाकणच्या रस्त्याच्या मीटिंग संदर्भात मुंबईला होतो. त्याच संदर्भातली काही दोन-तीन काम पुण्यात देखील होती. मेळाव्याची मला पूर्ण कल्पना होती. मेळाव्याला जाणं गरजेचं होतं, परंतु चाकणच्या रोडवरती रोजच अपघाताच्या घटना घडत असल्यामुळे सचिन अहिर यांना मी मला मेळाव्याला यायला जमणार नाही, असं सांगितलं होतं. रस्त्याच्या संदर्भातली शासकीय काम असल्याने मी पुण्यात होतो आणि मी माझ्या अनुपस्थितीचं कारण सांगितलेलं होतं, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. 


आमदार राजन साळवींच्या अनुपस्थितीने भुवया उंचावल्या


शिवसेना ठाकरेंच्या मेळाव्याला त्यांच्या पक्षाचे आमदार, खासदार, नेते, पदाधिकारी उपस्थित होते. अनेक आजी, माजी आमदार, खासदारही उपस्थित होते. पण या सर्वांमध्ये माजी आमदार राजन साळवी यांच्या अनुपस्थितीने भुवया उंचावल्या. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राजन साळवी उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले. पण, विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. राजापूर मतदारसंघातून सलग तीनदा विजय मिळवणाऱ्या राजन साळवींचा शिंदे गटाच्या किरण सामंत यांनी पराभव केला. तेव्हापासून साळवी नाराज असल्याची चर्चा आहे. ते येत्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश करतील अशा चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहेत.


शिवसेना ठाकरे गट फुटीवर सामंतांचा मोठा दावा


रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार पडायला सुरुवात होईल, असा दावा शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी केला.ठाकरेंच्या पक्षातील अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, त्याची सुरुवात रत्नागिरीतील माजी आमदारापासून होईल असं सामंत म्हणाले होते. त्यामुळे आता राजन साळवी यांचा शिवसेना प्रवेश निश्चित मानला जात आहे. साळवींसोबत ठाकरेंच्या पक्षातील आणखी कोणते नेते जाणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.