मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे नेते छगन भुजबळ आज (मंगळवारी) सकाळी 10 वाजता राजभवनमध्ये मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेले मंत्रिपद भुजबळ यांना दिले जात आहे. मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खाते होते. तेच खाते भुजबळ यांच्याकडे सुपुर्द केले जाईल. महायुतीचा मंत्रीमंडळ विस्तार होत असताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. त्यावेळी छगन भुजबळ प्रचंड नाराज झाले होते. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या अध्यक्षांवर हल्लाबोल केला होता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतल्या होत्या, ते अजित पवारांची साथ सोडतील अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू होती. मंत्रीमंडळ विस्तारातून डावलल्यानंतर छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेतृत्त्वापासून आणि पक्षीय घडामोडींपासून काहीसे दूर झाल्याचे दिसून आले होते.

Continues below advertisement


सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविला होता निर्णय


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यात सात दिवसांपूर्वीच भुजबळ यांना पुन्हा मंत्री करण्याबाबतची चर्चा आणि निर्णय झाला. त्यानंतर तो भुजबळ यांना कळवण्यात आल्याची माहिती आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने खात्रीलायक सूत्रांच्या आधारे दिले आहे. छगन भुजबळ यांनी आपल्याला केवळ एका ओळीचा संदेश मिळाल्याचे सांगितले. मला एवढंच सांगण्यात आलं की, राज्य मंत्रिमंडळात माझी वर्णी लागत आहे. मंत्रि‍पदाचा शपथविधी मंगळवारी सकाळी दहा वाजता होईल, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. आता थोड्याचेळात महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे राजभवनातील सोहळ्यात छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ देतील.


काल (सोमवारी) रात्री महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनपेक्षित घडामोडी घडल्या आणि छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार, हे निश्चित झाले. छगन भुजबळ हे मंगळवारी सकाळी 10 वाजता राजभवनात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत मंत्रिपदाची शपथ घेतील,  असे सांगितले जात आहे. छगन भुजबळ यांना मंत्रिपद स्वीकारल्यानंतर धनंजय मुंडे यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कारभार सोपवला जाईल, अशी दाट शक्यता आहे.


मंत्रीमंडळ विस्तारात डावल्याने नाराजी


राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार आल्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारावेळी छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली नव्हती. तेव्हापासून ते काहीसे नाराज होते. आपली नाराजी त्यांनी अनेकदा बोलून दाखवली होती. बीडमधील घटनाक्रमाच्या नंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला तेव्हापासूनच भुजबळ यांना पुन्हा मंत्रिपद दिले जाणार अशी चर्चा होती, मात्र, आता ती अखेर खरी ठरली. आज 10 वाजता ते शपथ घेणार आहेत.


त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर टीकाही केली होती. भुजबळ समर्थकांनी अनेक ठिकाणी निषेधही केले होते. मात्र नंतर मुख्यमंत्री फडणवीसांसह इतर नेत्यांनी भुजबळ यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते शांत राहिले होते. भुजबळ यांचा आज (मंगळवारी) राजभवनवर शपथविधी झाल्यानंतर लगेच मंत्रिमंडळ बैठक मंत्रालयात होणार असून तीत भुजबळ सहभागी होतील.


 


आणखी वाचा


नाराजी दूर झाली, महायुतीच्या मंत्रिमंडळात दमदार एन्ट्री; नगरसेवक ते मंत्री, कशी आहे भुजबळांची कारकीर्द?


छगन भुजबळ यांची मंत्रिपदावर वर्णी, आज घेणार शपथ; नव्या ट्विस्टमुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाची स्पर्धा आणखी वाढणार